मुंबई बातम्या

Breaking : मुंबईतील सर्व रस्ते आमच्या ताब्यात द्या, मुंबई महापालिकेची मुंबई हायकोर्टात भूमिका – Maharashtra Times

मुंबई : ‘मुंबईतील सर्व रस्त्यांच्या बाबतीत जोपर्यंत एकछत्री अंमल राहत नाही तोपर्यंत सर्व रस्ते कायमचे सुस्थितीत होऊ शकत नाहीत. मुंबईत तब्बल १५ वेगवेगळी प्राधिकरणे आहेत आणि त्यांच्या अखत्यारीत अनेक रस्ते येतात. मुंबई महापालिका अशा इतर रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, दुरुस्ती करणे ही कामे करू शकत नाही’, अशी भूमिका मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी शुक्रवारी मुंबई हायकोर्टात मांडली. ‘मुंबईतील सर्वच खराब रस्त्यांसाठी मुंबई महापालिका जबाबदार नाही’, असेही चहल यांनी ठासून सांगितले.

खराब रस्ते व खड्ड्यांमुळे नागरिकांचे जाणारे जीव यांचा विचार करून हायकोर्टाने पूर्वी सविस्तर निवाडा देऊन राज्य सरकार व सर्व महापालिकांना निर्देश दिले होते. तरीही खड्ड्यांमुळे जीव जात असल्याने हायकोर्टातील वकील रुजू ठक्कर यांनी अवमान याचिका केली आहे. त्याविषयी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी चहल यांनी खंडपीठासमोर ‘पॉवर पॉईंट’ सादरीकरण करत मुंबईतील रस्त्यांबाबत माहिती दिली. त्याचबरोबर खंडपीठाने पूर्वी केलेल्या सूचनेप्रमाणे मुंबईतील पालिकेच्या अखत्यारीतील २० सर्वाधिक खराब रस्त्यांची यादीही दिली. हे २० रस्ते तीन महिन्यांच्या आता सुस्थितीत केले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी मुंबईबाहेरच्या परिसरातील २० सर्वाधिक खराब रस्त्यांची यादी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे यांनी दिली. तसेच हे रस्ते डिसेंबर अखेरपर्यंत सुस्थितीत केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यानंतर रस्त्यांच्या प्रश्नावर हायकोर्टाला देखरेख ठेवावीच लागेल, असे स्पष्ट करून दर दोन महिन्यांनी प्रगती अहवाल देत राहा, असे निर्देश देत खंडपीठाने सुनावणी तहकूब केली.

तोतया पोलिसांचा मुंबईकर तरुणाला गंडा, हिरे-सोन्याने भरलेली बॅग हातोहात लंपास
‘रस्ते वारंवार खोदले जातात’

‘मुंबईत वेगवेगळी नियोजन प्राधिकरणे असल्याने अनेक अडचणी आहेत. अशा वेगवेगळ्या प्राधिकरणांमुळे मुंबईत महानगर गॅस, दूरध्वनी यंत्रणा अशा विविध वाहिन्यांचे जाळे जमिनीखाली आहे. त्यांची कामे करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रस्ते वारंवार खोदले जातात. त्याला परवानगी देण्यावाचूनही पालिकेकडे पर्याय नसतो’, अशी माहिती आयुक्तांनी कोर्टाला दिली.

‘उत्सव काळातही रस्त्यांची दुरवस्था’

‘गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व अन्य उत्सवांच्या काळात रस्त्यांवर खड्डे खोदून मोठमोठे मंडप घातले जातात. त्यामुळेही अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था होते’, अशी व्यथाही चहल यांनी मांडली.

धनंजय मुंडे म्हणाले, आमच्यातलं बहीण भावाचं नातं संपलं; पंकजा म्हणतात, ‘माझ्यासाठी…’

‘पुढच्या तीन वर्षांत काँक्रीटीकरण होणार पूर्ण’

‘महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या एकूण २०५० किलोमीटर रस्त्यापैकी ९९० किमी रस्त्याचे काँक्रीटीकरण झाले आहे. २६५ किमी रस्त्यांबाबत फेब्रुवारी कार्यादेश दिल्याने काम सुरू आहे. ३९७ किमी रस्त्याबाबत प्रक्रिया सुरू असून नोव्हेंबर महिन्यात कार्यादेश देण्याचे नियोजित आहे. उर्वरित ३९८ किमी रस्त्यांबाबतही पुढील सहा महिन्यांत प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे पुढील तीन वर्षांच्या आत आमच्या अखत्यारीतील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण होईल’, अशी ग्वाहीही चहल यांनी कोर्टात दिली.

आशिष शेलारांचा तो दावा वाळुंज कुटुंबीयांनी खोडला, उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत केलेला उल्लेख

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bmc-commissioner-iqbal-singh-chahal-said-give-us-all-roads-in-mumbai-for-development-20-worst-roads-hearing-in-hearing-at-bombay-high-court/articleshow/94562562.cms