मुंबई बातम्या

नवी मुंबई : संकलित कचऱ्यातून ६० फूट फ्लेमिंगो प्रतिकृती साकारली ! – Loksatta

‘फ्लेमिंगो सिटी’ म्हणून नावारूपाला येत असलेल्या नवी मुंबई शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या सहभागातून इंडियन स्वच्छता लीगमध्ये पाम बीच मार्गानजिकच्या विस्तृत खाडीकिनारी परिसरात कांदळवन स्वच्छता मोहीमी राबविण्यात आली . यामध्ये मॅनग्रुव्हज सोल्जर, जयश्री फाऊंडेशन, डिव्हाईन फाऊंडेशन या स्वच्छता व पर्यावरणविषयक नियमित कार्यरत असणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी तसेच महाविद्यालयांतील एनसीसीचे विद्यार्थी आणि जागरूक नागरिक अशा २०० हून अधिकानी सहभाग घेतला होता.

हेही वाचा >>> नवी मुंबई : नवरात्र उत्सवात गरबा व दांडियासाठी रात्री १० पर्यंतची तर अष्टमी नवमीला १२ पर्यंतची वेळ

या कांदळवन स्वच्छता मोहीमेचे आयोजन महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाच्या वतीने करण्यात आले होते. पामबीच मार्गावरील टी.ए.चाणक्य शेजारील शिवमंदिराच्या परिसरात जमा झाले आणि त्यांनी तेथील कांदळवन व परिसराची स्वच्छता केली. याठिकाणी संकलित ४५० किलोहून अधिक कचऱ्यामध्ये थर्माकोल, प्लास्टिक बॉटल्स, काचेच्या बाटल्या, चपला, बूट, कॅन, ऑईलचे डबे, वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग, प्लास्टिक, फिशींग नेट्सचे तुकडे अशा विविध प्रकारच्या वस्तूंचा समावेश होता. हा सर्व संकलित कचरा तेथील मोकळ्या जागेत एकत्रित आणण्यात आला.

हेही वाचा >>> नवी मुंबई : डंपर ब्रेक फेल – २ ,गंभीर जखमी ,११ गाड्यांचे नुकसान- शीव पनवेल वाशी पथकर भीषण अपघात

यातील अत्यंत महत्वाची विशेष बाब म्हणजे मोकळ्या जागेत कचरा आणल्यानंतर तो विशिष्ट प्रकारे ठेवण्यासाठी टाकाऊ साहित्यापासून कलात्मक वस्तू, शिल्पाकृती तयार करणाऱ्या किशोर विश्वास आर्ट्स संस्थेच्या प्रतिनिधींनी जमिनीवर ६० फूट लांब व ३२ फूट रूंद फ्लेमिंगो पक्षाची रेखाकृती जमिनीवर आखून ठेवली होती. या फ्लेमिंगो आकृतीच्या कोणत्या भागात कोणत्या स्वरूपाचा कचरा ठेवायचा याचे नियोजन आधीच करून ठेवण्यात आले होते. त्यानुसार फ्लेमिंगो रेखाकृतीच्या विशिष्ट भागात गोळा केलेल्या कचऱ्यातील विशिष्ट प्रकारचा कचरा ठेवण्यात आला व याव्दारे जमिनीवर फ्लेमिंगोची भव्य आकर्षक प्रतिकृती तयार झाली. स्वच्छताकार्य करताना त्यात जरा कल्पकता वापरली तर टाकाऊतून टिकाऊ संकल्पनेतून चांगली निर्मिती होऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण या माध्यमातून साकारले आहे.

Source: https://www.loksatta.com/navimumbai/navi-mumbai-60-feet-flamingo-replica-made-from-collected-waste-amy-95-3150916/