मुंबई बातम्या

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत सर्वसामान्यांची परवड; सोईसुविधांचा अभाव! – MahaMTB

bmc hospitals

मुंबई : साधारण मुंबई महापालिकेच्या 2022-23 या अर्थसंकल्पीय वर्षात तब्बल 2,660.56 कोटींची तरतूद ही आरोग्य विभागासाठी करण्यात आली आहे. तसेच, 2021-22 या अर्थसंकल्पीय वर्षात 1,102.38 कोटींची तरतूद करण्यात आली होती. परंतु, असे असतानाही पालिका रुग्णालयांच्या बाबतीत लोकांचा जो समज आहे, तो काही पालिका अद्याप बदलू शकलेली नाही. पालिकेचे रुग्णालय म्हणजे अस्वच्छता व रुग्णांकडे होणारे दुर्लक्ष असेच चित्र नागरिकांच्या डोळ्यांसमोर उभे राहते. नागरिकांचा हा समज कितपत खरा आहे, हे पाहण्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या टीमने मुंबईतील काही निवडक पालिका रुग्णालयांचा सर्व्हे केला व त्यातल्याच काही रुग्णालयांची सत्य परिस्थिती आपण आतापर्यंत पाहिली.

एकंदर पालिकेची चार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालये असून एक दंत महाविद्यालय आणि रुग्णालयदेखील आहे. त्याचबरोबर, साधारण 16 महानगरपालिका सामान्य रुग्णालये, सहा विशेष रुग्णालये, 29 प्रसूतिगृहे, 175 नगरपालिका दवाखाने आणि 183 आरोग्य पोस्टसुद्धा महापालिकेच्या अंतर्गत आहेत. पालिकेच्या रुग्णालयात दरवर्षी साधारण 15 दशलक्ष रुग्णांवर उपचार केले जातात. पालिकेच्या रुग्णालयांची ‘इनडोअर बेड स्ट्रेंथ’ ही 12 हजारांहून जास्त आहे. परंतु, असे असतानाही पालिकेच्या शीवमधील लोकमान्य टिळक रुग्णालयासोबतच, राजावाडी रुग्णालय, नायर रुग्णालय येथे बहुतांश जागी अस्वच्छता पाहायला मिळाली. रुग्णालय म्हटले, की ते रोजच्या रोज स्वच्छ ठेवणे, ही त्या रुग्णालयाची जबाबदारी असते. परंतु, ही रुग्णालये पाहता अनेक दिवस स्वच्छ करण्यात आले की, नाही अशी शंका वाटते. तसेच, पावसाळ्यात रुग्णालयांच्या भिंतींमधूनही पावसाचे पाणी झिरपताना दिसते.

साधारण 17 हजारांहूनही अधिक कर्मचारी हे पालिका रुग्णालयांमध्ये कार्यरत आहेत. परंतु, असे असतानाही पालिकेच्या राजावाडी, नायर व जेजे रुग्णालयांमध्ये रुग्ण व त्यांचे नातेवाईक हे तासन्तास रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळाले. तसेच, रुग्णांना स्वतःची मदत ही स्वतःलाच करावी लागत असल्याचेही निदर्शनास आले. तेव्हा, पालिका रुग्णालयातील कर्मचार्‍यांची संख्या नक्की कमी पडते, आहे की पुरेसे कर्मचारी असूनही ते कामांमध्ये हलगर्जीपणा करत आहेत, असा प्रश्न उपस्थित होतो.

गोरगरिबांना महागडी व खासगी रुग्णालये ही परवडत नाहीत. त्यामुळे महापालिकेची रुग्णालये हाच एक त्यांचा आधार असतो. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये केवळ मुंबईतूनच नाही, तर गावाखेड्यातूनही रुग्ण उपचारांसाठी येत असतात. अनेक परदेशी रुग्णही येथे उपचार घेण्यास येतात. परंतु, मुंबई महापालिकेची रुग्णालये ही जर अशीच अस्वच्छ असतील किंवा रुग्णालयांचे कर्मचारी हे असेच निष्काळजीपणा करत असतील, तर गोरगरिबांनी जायचे कुठे? तसेच परदेशी रुग्णांसमोरही मुंबई महापालिका स्वतःची ही अशीच ‘इमेज’ बनवू इच्छित आहे का?

रुग्णांसोबत येणार्‍या नातेवाईकांसाठीही प्रशासनाने काहीतरी सोय करावी, अशी मागणी अनेकदा नागरिकांकडून करण्यात आली आहे. ज्यावेळी आम्ही रुग्णालयांमध्ये पोहोचलो तेव्हाही तेथील रुग्णांच्या नातेवाईकांचे तेच म्हणणे होते. परंतु, जर आपण हे कॅमेर्‍यासमोर येऊन बोललो आणि आपल्या रुग्णावर रुग्णालयाने उपचार नाही केले तर, अशी भीती या नागरिकांमध्ये होती. तेव्हा मुंबई महापालिका आता तरी या नागरिकांचा विचार करणार आहे का? नागरिकांच्या या मागणीचा मान मुंबई महापालिका ठेवणार का? नागरिकांमध्ये मुंबई महापालिकेला स्वतःविषयी आदर निर्माण करायचा आहे की भीती?

मुंबई महापालिका दरवर्षी कोट्यवधींची तरतूद आरोग्य विभागासाठी करते. परंतु, केलेल्या तरतुदीपैकी किमान काम तरी दिसावे, एवढीच माफक अपेक्षा मुंबई महापालिकेकडून आहे. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे साथीच्या रोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी रुग्णालयांमध्ये साथीच्या रोगांसाठी बेड रिझर्व्ह करण्यास सांगितले असून जिथे औषधांची व टेस्टची गरज असेल तिथे करण्यात येईल, असे आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी सांगितले आहे. परंतु, अस्वच्छतेने भरलेल्या या रुग्णालयांमध्ये येऊनच एखादा आजारी पडला, तर याची जबाबदारी कोणाची?

– शेफाली ढवण 

Source: https://www.mahamtb.com/Encyc/2022/9/24/bmc-hospitals-mumbai.html