मुंबई बातम्या

नायर रुग्णालयात विश्रामालयाचा अभाव – MahaMTB

nair hospital

मुंबई : मुंबई महापालिकेचे मुंबई सेंट्रलमधील नायर रुग्णालय म्हणजे केवळ रुग्णांसाठीच नाही, तर वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठीही एक महत्त्वाची वैद्यकीय संस्था आहे. नायर रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय हे दंत शिक्षणासाठी मुंबईत प्रसिद्ध आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेविषयी नागरिकांचा जो एक नकारात्मक समज आहे, तो खोडून काढण्यास हे रुग्णालय सक्षम आहे, असे वाटते. परंतु, मुंबई ग्राऊंड झिरोच्या निमित्ताने जेव्हा दै. ‘मुंबई तरुण भारत’ची टीम तिथे पोहोचली, त्यावेळी त्यांना एक वेगळाच अनुभव आला.

नातेवाईकांची परवड

मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात स्वच्छता जरी ठेवण्यात येत असली, तरी या रुग्णालयात ठिकठिकाणी पान खाऊन थुंकलेले डाग निदर्शनास येत होते. तसेच, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी कोणतीही सोय नसल्यामुळे त्यांना रुग्णालयाच्या परिसरातच झोपावे लागत आहे. आम्हाला थांबण्यासाठी किमान तात्पुरती तरी सोय करण्यात यावी, अशी मागणी येथील रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे. यासंदर्भात आम्ही रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कर्करोग असणार्‍या रुग्णांच्या नातेवाईकांची सोय ही काही स्थानिक संस्थांच्या मदतीने केली जात असल्याची माहिती नायर रुग्णालयाकडून देण्यात आली आणि गरजू रुग्णांसाठी 022-23027214/15 हे दोन हेल्पलाईन नंबर असल्याचेही सांगण्यात आले आहे.

नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवणे, हीदेखील रुग्णालयाची जबाबदारीच

एवढे असूनही रुग्णांचे नातेवाईक अजूनही रुग्णालयाच्याच आवारात का विश्राम घेत आहेत? केवळ कर्करोग रुग्णांच्या नातेवाईकांसाठीच जर सोय करण्यास रुग्णालयाकडून प्रयत्न करण्यात येत असतील, तर इतर रुग्णांच्या नातेवाईकांनी जायचे कुठे, केवळ हेल्पलाईन नंबर देणे म्हणजे आपले काम झाले असे होत नसून, यासंदर्भात नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवणे, हीदेखील एक जबाबदारीच असते. कारण केवळ उच्चशिक्षित रुग्णच या रुग्णालयात उपचार घेण्यास येतात, असे नसून अनेक गरजू रुग्णसुद्धा उपचार घेण्यास नायर रुग्णालयात येतात. त्यामुळे त्यांच्यासाठी व त्यांच्यासोबत येणार्‍या नातेवाईकांचीही सोय करण्यात यावी, अशी मागणी अनेकदा नागरिकांकडून करण्यात येते.

– शेफाली ढवण 

Source: https://www.mahamtb.com/Encyc/2022/9/24/bmc-nair-hospital-mumbai.html