मुंबई बातम्या

मुंबई : प्रथम श्रेणी आणि वातानुकूलित लोकलच्या पासमधील फरक भरून प्रवास करता येणार ; ‘क्रिस’कडून चाचणी पूर्ण, लवकरच अंमलबजावणी – Loksatta

सामान्य लोकलमधील प्रथम श्रेणी पासधारकांनाही लवकरच वातानुकूलित लोकलमधील गारेगार प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. मात्र त्यासाठी प्रवाशांना सामान्य लोकलमधील प्रथम श्रेणी आणि वातानुकूलित लोकलच्या पासमधील फरकाची रक्कम भरावी लागणार आहे. याची सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिमकडून (क्रिस) चाचणी सुरू होती. ही चाचणी पूर्ण झाल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. लवकरच ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> “महाराष्ट्रात बाप पळवणारी औलाद…” उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर जोरदार टोलेबाजी

सध्या मध्य रेल्वेवर दररोज ५६, तर पश्चिम रेल्वेवर ४८ वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या होत असून प्रवाशांकडून या लोकलना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी होणाऱ्या फेऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. पूर्वी सामान्य लोकलमधील प्रथम श्रेणीतून प्रवास करणारे प्रवासी मोठ्या संख्येने वातानुकूलित लोकलकडे वळत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने या प्रवाशांना वातानुकूलित लोकलकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा पास वातानुकूलित लोकलच्या पासमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिकीट खिडकीवर पासदरातील फरक भरून नवीन पास उपलब्ध करण्यात येणार आहे. यासंदर्भात ‘क्रिस’ने चाचपणी पूर्ण केल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. येत्या काही दिवसांमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी ही सेवा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Source: https://www.loksatta.com/mumbai/the-difference-between-first-class-and-air-conditioned-local-passes-can-be-paid-mumbai-print-news-amy-95-3142590/