मुंबई बातम्या

मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षक दलात प्रचंड असंतोष – Loksatta

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्तांच्या रक्षणाची जबाबदारी लिलया पेलणाऱ्या सुरक्षा रक्षक दलात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड असंतोष धुमसत आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार त्यास कारणीभूत ठरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सुरक्षा रक्षक, महिला सुरक्षा रक्षकांची छायाचित्रे काढणे, लहानसहान चुकांसाठी दंडात्मक कारवाई करणे, घरापासून दूरवर बदली करणे असे प्रकार सुरू असून या प्रकारांमुळे सुरक्षा रक्षकांमध्ये असंतोष वाढत आहे.

श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्तांचे रक्षण करणाऱ्या सुरक्षा रक्षकांनाच सध्या असुरक्षित वाटू लागले आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असून कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची स्वतःच्या वैयक्तिक मोबाइलवरून छायाचित्रे काढून ती व्हाट्स्ॲपवर पाठवली जात असल्याचा आरोप काही सुरक्षा रक्षकांनी केला आहे. तसेच विश्रांतीगृहात येऊनही छायाचित्रे काढण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याप्रकरणी दि म्युनिसिपल युनियनने महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र पाठवून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच महिला सुरक्षा रक्षकांची छायाचित्रे काढल्याप्रकरणी महिला आयोगाकडे जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

हेही वाचा : “‘शिल्लक सेने’च्या ‘टोमणे मेळाव्याला’ परवानगी द्या! खंजीर, मर्द, मावळा…”, मनसेनं उडवली खिल्ली; ‘बारामती’चाही केला उल्लेख

मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागातील कर्मचारी ३६५ दिवस २४ तास तीन पाळ्यांमध्ये काम करीत असतात. मात्र या कर्मचाऱ्यांचा छळ केला जात असल्याचा आरोप युनियनने केला आहे. पायाला दुखापत झाल्यामुळे बूट न घातणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर दंडात्मक कारवाई करणे, आठ तासाच्या पाळीत विश्रांतीची वेळ निश्चित न करणे, निर्जनस्थळी कामावर असलेल्या रक्षकाला विश्रांतीसाठी पर्यायी मनुष्यबळाची व्यवस्था न करणे, घरापासून लांब असलेल्या ठिकाणी कामावर पाठवणे असे प्रकार सुरू असल्याचा आरोप युनियनने केला आहे. तसेच गेली तीन वर्षे रक्षकांना नवा गणवेश देण्यात आलेला नाही, अत्यंत निकृष्ट दर्जाचे बूट देण्यात आले आहेत, असेही आरोप करण्यात आले आहेत.

Source: https://www.loksatta.com/mumbai/massive-dissatisfaction-in-security-forces-of-mumbai-municipal-corporation-mumbai-print-news-tmb-01-3138913/