मुंबई बातम्या

लम्पीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत प्राण्यांचा बाजार, प्रदर्शनावर बंदी – Loksatta

मुंबई : लम्पी रोगाच्या वाढत्या संसर्गामुळे मुंबईला नियंत्रित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. यानुसार शहरात प्राण्यांची ने-आण करण्यावर बंदी घालण्यात आली असून प्राण्यांचा बाजार भरवणे, प्रदर्शनावरही मुंबई पोलिसांकडून बंदी करण्यात आली. 

राजस्थान, मध्य प्रदेशात लम्पी त्वचारोगाचा शेकडो प्राण्यांना संसर्ग झाला आहे. मुंबईत ही साथ रोखण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. सध्या प्राण्यांची ने-आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. जिवंत अथवा मृत गुरे, कोणत्याही बाधित झालेल्या गुरांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आदींवर मनाई करण्यात आली.

गुरांचे बाजार भरवणे, जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच बाधित गुरांना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करण्यास बंदी करण्यात आली.

१३ ऑक्टोबपर्यंत आदेश..

मुंबईत लम्पी रोग नियंत्रणाबाबतचे आदेश १३ ऑक्टोबपर्यंत लागू असतील. त्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय दंड विधान संहिता व प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांकडून सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

लम्पीची बाधा मानवाला होत नसल्याचा निर्वाळा 

नागपूर: जुलै महिन्यापासून अनेक राज्यांत गोवंशात लंपी रोगाची  साथ मोठय़ा प्रमाणावर दिसून येत आहे . लम्पी त्वचारोग हा गोवंशातील विषाणूजन्य रोग असून तो शेळय़ा-मेंढय़ांत व कोंबडय़ांत अजिबात होत नाही. त्यामुळे  मटण अथवा चिकन खाल्ल्याने मनुष्यास रोग होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विशेष म्हणजे  लम्पी हा मनुष्यात अजिबात होत नाही. गेल्या ९३ वर्षांपासून या रोगाची लागण कधी मनुष्यास झाल्याची नोंद नाही. तसेच लंपी रोग जनावरांच्या सान्निध्यात आल्याने किंवा रोगी जनावरांचे दूध प्याल्याने होत नाही. विशेष म्हणजे लम्पीचे विषाणू हे ७०त् सें. ग्रे तापमानाला १-३ मिनिटांत असक्रिय  होतात. त्यामुळे उकळलेल्या दुधात व  पाकिटातील पाश्चराइज्ड दुधात जंतू जिवंत राहत नाहीत. दूध हे उकळूनच प्यावे आणि मांस हे शिजवूनच खावे, असे आवाहन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे विस्तार शिक्षण संचालक प्रा. डॉ. अनिल भिकाने यांनी केले.

Source: https://www.loksatta.com/mumbai/animal-market-banned-in-mumbai-due-to-lumpy-skin-disease-zws-70-3136192/