मुंबई बातम्या

मुंबई : ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ची चाचणी सप्टेंबर अखेरीस ? – Loksatta

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘मेट्रो २ अ’ (दहिसर ते डी. एन. नगर) आणि ‘मेट्रो ७’ (दहिसर ते अंधेरी) मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्यातील रखलेली चाचणी सप्टेंबर अखेरपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. एमएमआरडीएने चाचणीचा मुहूर्त साधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सप्टेंबर महिन्यामधील शेवटच्या आठवड्यातील वेळ मागितली आहे. वेळ निश्चित झाल्यानंतर चाचणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> मुंबई : हार्बर मार्गाचा बोरिवलीपर्यंत विस्तार ; मालाड स्थानक उन्नत होणार

‘मेट्रो अ’ आणि ‘मेट्रो ७’चा दहिसर ते आरे असा एकूण २० किमीचा टप्पा एप्रिलमध्ये सेवेत दाखल झाला आहे. हा टप्पा सुरू करतानाच ‘मेट्रो २ अ’मधील डहाणूकरवाडी ते डी. एन. नगर आणि ‘मेट्रो ७’मधील आरे ते अंधेरी पूर्व असा दुसरा टप्पा १५ ऑगस्टला सुरू करण्यात येईल, असे एमएमआरडीएने जाहीर केले होते. पण नियोजित वेळेत काम पूर्ण होऊ न शकल्याने हा मुहूर्त चुकला. आता यासाठी डिसेंबरमधील नवा मुहूर्त निश्चित करण्यात आले असून या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे आता मेट्रोच्या चाचणीला सुरुवात करून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रियेला सुरू करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे.

हेही वाचा >>> मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक ; हार्बरवर मेगाब्लॉक नाही

मेट्रोच्या चाचणीची तयारी पूर्ण झाली असून यासाठी अद्याप मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळालेली नाही. वेळ निश्चित झाल्यानंतर चाचणी करण्यात येणार आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही चाचणी घेण्याचा प्रयत्न असल्याची माहिती एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी दिली. याविषयी महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांना विचारले असता त्यांनी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात चाचणी घेण्यात येणार असल्याच्या तसेच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्याकडे वेळ मागितल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

Source: https://www.loksatta.com/mumbai/mumbai-metro-2a-and-metro-7-to-be-tested-by-the-end-of-september-mumbai-print-news-amy-95-3134235/