मुंबई बातम्या

‘लम्पी’ रोखण्यासाठी मुंबईतील तबेले, गोशाळांचे सर्वेक्षण सुरु – Lokmat

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या निर्णयानुसार, लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर पशुवैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक यांचा समावेश असलेला चमू गठीत केला आहे. या चमुद्वारे मुंबईतील तबेले व गोशाळा यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आलेले आहे. तसेच महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागास गोशाळा व आजूबाजूच्या परिसरात धूर फवारणी आणि कीटक नियंत्रण करण्याबाबत उपाययोजना करण्यास सांगण्यात आलेले आहे.

२०१९ च्या पशुगणनेनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार २२६ गोजातीय जनावरे व २४ हजार ३८८ म्हैस-वर्गीय जनावरे आहेत. या जनावरांचे लसीकरण या आठवड्यात पूर्ण करण्यात येणार आहे. लम्पी साथरोगाच्या पार्श्वभूमीवर या जनावरांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले असून महानगरपालिकेच्या कीटक नियंत्रण खात्याद्वारे गोशाळा व आजूबाजूच्या परिसरात योग्य त्या उपाययोजना करण्यास देखील प्रारंभ करण्यात आला आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख तथा देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली आहे.

तबेले- गोशाळा चालक यांना सूचना

रोगाची लक्षणे आढळून आल्यास त्वरित संबंधित माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य खात्यास कळविणे बंधनकारक आहे. गोजातीय प्रजातींची सर्व गुरे व म्हशी यांची, ज्या ठिकाणी ते पाळले (ठेवले) जातात; त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई आहे.गोजातीय प्रजातींची बाधित असलेली कोणतीही जीवंत किंवा मृत गुरे व म्हशी, गोजातीय प्रजातींची कोणत्याही बाधित झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवा-यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी, नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई करण्यात येत आहे. बाह्य कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये. बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.  गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात. बाधित परिसरात स्वच्छता ठेवावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी. फवारणीसाठी १ टक्के फॉर्मलीन किंवा २ ते ३ टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल २ टक्के यांचा वापर करावा.

Web Title: Preventive measures in the wake of lumpy outbreak Survey of stables cowsheds in Mumbai started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Source: https://www.lokmat.com/health/preventive-measures-in-the-wake-of-lumpy-outbreak-survey-of-stables-cowsheds-in-mumbai-started-a657-c747/