मुंबई बातम्या

मुंबई महानगरपालिकेत बदली सत्र सुरूच ; पुन्हा अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि निर्णय मागे घेण्याचा घाट – Loksatta

मुंबई : मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांच्या बदली सत्रावरून विविध स्तरातून टीका होऊ लागली आहे. मात्र महानगरपालिकेतील बदली सत्र अद्याप सुरूच आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मंगळवारी चार उपयुक्तांमध्ये खाते पालट केला. मुंबई महानगरपालिकेतील सह आयुक्त रमेश पवार यांची प्रतिनियुक्तीद्वारे नाशिकच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. मात्र नाशिकच्या आयुक्तपदी अन्य अधिकाऱ्याची नियुक्ती होताच रमेश पवार यांना पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेत सह आयुक्तपदाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत. आता यांच्याकडे सहआयुक्त (सुधार) पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सत्तातरानंतर मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. गेल्या दोन महिन्यात उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या आहेत. ठाकरे सरकारच्या काळात मुंबई महानगरपालिकेतील सहआयुक्त रमेश पवार यांची प्रतिनियुक्तीवर नाशिकच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. मात्र राज्यात सत्तातर झाल्यानंतर त्यांना नाशिकच्या आयुक्तपदावरून हटवण्यात आले. त्यामुळे पवार यांच्याकडे पुन्हा मुंबई महानगरपालिकेतील सह आयुक्त (सुधार) पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर उपायुक्त संजोग कबरे यांच्याकडे मुंबई सुशिभिकरण प्रकल्पाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान, उपायुक्त चंदा जाधव यांच्याकडे अद्याप कोणत्याही पदाचा कार्यभार देण्यात आलेला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होता आहे.

हेही वाचा : Municipal Election: मनसेचं एकला चलो रे? संदीप देशपांडेंचं सूचक विधान, म्हणाले “राजसाहेबांनी…”

बदली आणि निर्णय रद्द

सध्या उपायुक्त (सुधार) पदाची जबाबदारी सांभाळणारे केशव उबाळे यांच्याकडे सहआयुक्त अजित कुंभार यांच्याकडील दक्षता विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला होता आणि कुंभार यांच्याकडे केवळ शिक्षण विभागाचा कार्यभार ठेवण्यात आला होता. मात्र आयुक्तांनी एका दिवसात हा निर्णय फिरवला. कुंभार यांच्याकडे सह आयुक्त (दक्षता) विभागाची, तर उबाळे यांच्याकडे उपायुक्त (शिक्षण) विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामुळे मुंबई महानगरपालिकेत आश्चर्य व्यक्त होत आहे.

Source: https://www.loksatta.com/mumbai/transfer-session-continues-in-mumbai-municipal-corporation-mumbai-print-news-tmb-01-3128508/