मुंबई बातम्या

अस्वच्छता कराल, तर दंड भराल! शहर स्वच्छतेसाठी मुंबई महापालिकेमार्फत महत्त्वाचे पाऊल – Maharashtra Times

मुंबई : मुंबई शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेमार्फत महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. मुंबईत रस्ते, पालिका विभागनिहाय भाग, समुद्रकिनारे स्वच्छ राहण्यासाठी पालिकेने सुमारे ७०० क्लीन अप मार्शलची नेमणूक करण्याचे ठरविले आहे. मुंबईत अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर या क्लीन अप मार्शलकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पालिकेच्या प्रत्येक विभागात किमान ३० यानुसार ७०० क्लीन अप मार्शलची लवकरच नेमणूक केली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया काही दिवसांतच पूर्ण होणार आहे.

करोना कालावधीत मास्क न वापरणाऱ्यांसह रस्त्यांवर अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात कारवाईची जबाबदारी क्लीन अप मार्शल पथकांकडे देण्यात आली होती. त्यातून पालिकेस मोठ्या प्रमाणात दंडही मिळाला होता. त्यावेळी दंड कारवाईसह विविध कारणांनी चर्चेत आलेल्या क्लीन अप मार्शलवर आता ही आणखी जबाबदारी सोपविली जात आहे.

मुंबईत गिरगाव, जुहू, गोराई, मढ, दादर, मनोरी आदी समुद्रकिनाऱ्यांसह विविध पर्यटनस्थळे आहेत. गिरगाव, जुहू, गोराई आदी समुद्रकिनारी पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असते. करोना कालावधीत किनाऱ्यांवर निर्बंध असल्याने किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी ओसरली होती. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मुंबईत पर्यटकांसह नियमित गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे पालिकेसमोर स्वच्छता राखण्याचेही मोठे आव्हान आहे. त्यासाठीच अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी क्लीन अप मार्शल अधिक काटेकोरपणे लक्ष ठेवणार आहे.

संपूर्ण मुंबईत अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासह दंडात्मक कारवाईसाठी क्लीन अप मार्शल नेमले जातील. मुंबईतील समुद्रकिनारे अधिकाधिक स्वच्छ राहावेत यासाठी पालिकेकडून गेल्या काही वर्षांत अधिक चांगल्या पद्धतीने किनाऱ्यांची देखभाल केली जात आहे. गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी ही यापैकीच काही ठळक उदाहरणे आहेत. त्या किनाऱ्यांवर पूर्वी आढळणारे अस्वच्छतेचे चित्र आता खूप बदलले आहे.

‘मुंबईत स्वच्छता राखण्यासाठी पालिकेच्या घनकचरा विभागामार्फत संपूर्ण मुंबईत क्लीन अप मार्शलची फौज पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार पालिकेच्या एका विभागातंर्गत २५ ते ३० क्लीन अप मार्शलची नेमणूक केली जाईल. अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांना या क्लीन अप मार्शलकडून दंड आकारला जाईल. मुंबई स्वच्छ राखण्यासाठी क्लीन अप मार्शलची नियुक्ती उपयुक्त ठरेल’, असे पालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त संगीता हसनाळे यांनी सांगितले.

मटा भूमिका

जबाबदारी केवळ पालिकेची नाही

समुद्रकिनारे, रस्ते स्वच्छ राखण्यात महापालिकेसह पर्यटक, मुंबईकरांचीही जबाबदारी मोठी आहे. कुठेही कचरा टाकण्याची सवय मुंबईकरांना सोडून द्यावी लागेल. गिरगाव, जुहू चौपाट्यांकडील खाऊगल्लीत पोटपूजा केल्यानंतर तिथे आपल्याकडून स्वच्छता कशी राखली जाईल याचे भान राखले गेले पाहिजे. बेशिस्त नागरिकांवर वचक बसविण्यासाठी क्लीन अप मार्शलची नियुक्ती हे पाऊल स्वागतार्ह. जिथे नियम मोडला जाईल, तिथे हे मार्शल दंडात्मक कारवाई करतील. परंतु, मुळात अस्वच्छता होणार नाही याची काळजी नागरिकांनी घेतल्यास ती वेळच येणार नाही. स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याच्या या निर्णयाचे स्वागत करायला हरकत नाही.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/an-important-step-is-being-taken-by-bmc-to-keep-city-clean/articleshow/94143161.cms