मुंबई बातम्या

विकासकांची मुंबई पेक्षा नवी मुंबईला पसंती – Loksatta

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या स्वप्न नगरी मुंबईला अनेक बाबतीत पहिली पसंती दिली जाते पण सद्या विकासक (बिल्डर) नवी मुंबईला पसंती देताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने अर्थात एम एम आर डी ए ने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बिकेसी) मध्ये विक्री साठी काढलेल्या वाणिज्यिक भूखंड विक्रीला विकासकांनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे नगरविकास विभागाला हा विस्तीर्ण भूखंड विकण्यासाठी एक समिती स्थापन करावी लागली आहे याउलट सिडको सद्या विक्री करीत असलेल्या भूखंडावर उड्या पडत आहेत. नियोजित विमानतळ, मेट्रो, कॉर्पोरेट पार्क, उरण रेल्वे विस्तार महागृह निर्मिती यामुळे नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात बांधकाम होत आहे. नुकतचं सिडकोने ऐरोली, कोपरखैरणे, कळंबोली, कामोठे आणि पनवेल मधील १४ भूखंडाची बोली लावली होती त्याला चांगला प्रतिसाद लाभला असून कोपरखैरणे सेक्टर ११ मधील भूखंडाला ३ लाख २५ हजार ८० रुपये प्रति चौरस मीटर दर आला आहे.

हेही वाचा >>> उरण मध्ये अनंतचतुर्थीच्या १ हजार ७१२ गणपतीचे विसर्जन

ऐरोली कोपरखैरणे पामबीच विस्तार पालिका लवकरच करणार असून हा मार्ग मुंब्राला जोडला जाणार आहे त्यामुळे विकासक ऐरोली आणि कोपरखैरणे उपनगरांना पसंती देत असल्याचे दिसून येत आहे तर पनवेल मधील सेक्टर १३ मधील एका भूखंडाला १लाख ११ हजार २८३ प्रति चौरस मीटर अशी सर्वात जास्त बोली लागली आहे पनवेल मधील नियोजित विमानतळ, शिवडी उरण सागरी मार्ग यामुळे पनवेल उरण मध्ये जास्त गृह व वाणिज्यिक निर्मिती होत आहे सिडकोने अलीकडे अनेक भूखंड विक्रीला काढले होते ते हातोहात विकले जात आहेत। सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ संजय मुखर्जी यांनी नवीन विक्री तंत्रज्ञान स्वीकारले असून भूखंडावर अतिक्रमण होऊन ते हातातून जाण्यापेक्षा विक्री करणे जास्त फायदेशीर ठरत आहे यामुळे सिडकोची खाली झालेली तिजोरी पूर्वी सारखी भरू लागली आहे मुंबई पेक्षा विकासकांच्या कल आता नवी मुंबईकडे वळू असून जास्त गृह निर्मिती झाल्यास घरांच्या किंमती मर्यादित राहणार आहेत. त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होईल असा विश्वास बांधकाम क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत.

Source: https://www.loksatta.com/navimumbai/developers-prefer-navi-mumbai-over-mumbai-navi-mumbai-amy-95-3118812/