मुंबई बातम्या

मुंबई : विसर्जनानंतर मध्यरात्री घरी परतणाऱ्या भाविकांच्या मदतीला मध्य रेल्वे धावली – Loksatta

अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री उशीरा गणेश विसर्जनानंतर घरी परतणाऱ्या भाविकांचे हाल होऊ नयेत यासाठी मध्य रेल्वेने दहा विशेष लोकल फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ९ सप्टेंबर रोजी रात्री मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-ठाणे, कल्याण आणि सीएसएमटी-पनवेल मार्गावर या फेऱ्या धावणार आहेत. या उपनगरीय विशेष फेऱ्या सर्व स्थानकांवर थांबाणार आहेत. त्यामुळे भाविकांना दिलासा मिळेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

कल्याण येथून मध्यरात्री १२.०५ वाजता सोडण्यात येणारी विशेष लोकल सीएसएमटी येथे मध्यरात्री ०१.३० वाजता पोहोचेल. ठाणे येथून मध्यरात्री ०१.०० वाजता लोकल सोडण्यात येणार असून ती सीएसएमटीला मध्यरात्री ०२.०० वाजता पोहोचेल. ठाणे येथून ०२.०० वाजता सुटणारी लोकल सीएसएमटीत पहाटे ०३.०० वाजता पोहोचेल.तर सीएसएमटी येथून मध्यरात्री ०१.४० वाजता लोकल सोडण्यात येणार असून ती कल्याण येथे पहाटे ०३.१० वाजता पोहोचेल. सीएसएमटीतून मध्यरात्री ०२.३० वाजता सुटणारी लोकल ठाणे येथे ०३.३० वाजता पोहोचेल. सीएसएमटीतून पहाटे ३.२५ वाजता लोकल सोडण्यात येणार असून ती कल्याण येथे पहाटे ४.५५ वाजता पोहोचेल.

हेही वाचा : मुंबई : म्हाडाच्या गृहप्रकल्पातील ई-नोंदणीसाठी विकासकांनी पुढे यावे ; श्रावण हर्डीकर

हार्बरवर सीएसएमटी ते पनवेलदरम्यानही विशेष लोकल फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. पनवेल येथून मध्यरात्री ०१.०० वाजता सोडण्यात येणारी लोकल मध्यरात्री २.२० वाजता सीएसएमटीला पोहोचेल. पनवेल येथून मध्यरात्री ०१.४५ वाजता सुटणारी लोकल सीएसएमटी येथे पहाटे ०३.०५ वाजता पोहोचेल. याशिवाय सीएसएमटी-पनवेल लोकल मध्यरात्री ०१.३० वाजता आणि सीएसएमटी-पनवेल लोकल मध्यरात्री ०२.४५ वाजता सुटतील.

रात्री उशिरा गणेश दर्शन घेऊन परतणाऱ्या गणेशभक्तांसाठी शेवटच्या लोकलनंतर रात्री उशिरा काही विशेष रेल्वे लोकल सेवा सुरू ठेवाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्र पाठविले होते.

Source: https://www.loksatta.com/mumbai/centrail-railway-help-devotees-from-returning-ganesh-immersion-midnight-in-mumbai-print-news-tmb-01-3115306/