मुंबई बातम्या

मुंबई : चार कोटी रुपयांचा गांजा जप्त ; एनसीबीची कारवाई – Loksatta

शहरात विक्रीसाठी आणलेल्या चार कोटीं रुपयांचा गांजा जप्त करण्यात अंमलीपदार्थ नियंत्रण पथकाला(एनसीबी) यश आले आहे. या कारवाईत २१० किलो गांजा जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. आरोपी गेल्या काही वर्षांपासून मुंबईच्या विविध भागात विशेषतः गोवंडी, मानखुर्द आणि इतर स्थानिक भागात गांजा आणि इतर अमली पदार्थांचा पुरवठा करत होता.

आंध्र प्रदेश व उडिसा या भागांमधून मुंबईत मोठ्याप्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. या माहितीचे विश्लेषण केले असता पुण्यातून एक आरोपी गोवंडी येथे गांजा घेऊन येणार असल्याची माहिती एसीबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पुणे-मुंबई महामार्गावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या तस्कराचा आणि वाहनाचा एनसीबीच्या पथकाने पाठलाग केला. पण सुरक्षा यंत्रणांचा ससेमिरा चुकवण्यासाठी चालक मार्ग बदलत होता. त्याने खोपोली मार्गावर वाहन वळवले. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने आरोपीचे वाहन थांबवून त्याची तपासणी केली.

आरोपीने तपकिरी चिकटपट्टीच्या सहाय्याने सीलबंद केलेली ९८ पाकिटे एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सापडली. त्यात २१० किलो गांजा सापडला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गांजा जप्त करण्यात आला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी मुंबईतील रहिवासी आहे. त्याची चौकशी केली असता, त्याने यापूर्वी अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असल्याचे सांगितले. एनसीबीने गेल्या दोन महिन्यांत मोठ्याप्रमाणात गांजा जप्त केल्यामुळे सध्या गांजाची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे पुण्यातील एका मुख्य विक्रेत्याकडून त्याने गांजा खरेदी केल्याचे सांगितले. गेल्या चार-पाच वर्षांपासून तो अंमलीपदार्थांच्या तस्करीत सक्रिय होता. आंध्र प्रदेश व उडिसा या परिसरातील नक्षलग्रस्त विभागात या गांजाची निर्मिती केली जाते. त्यानंतर देशातील विविध राज्यांमध्ये त्यांची विक्री करण्यात येते.

Source: https://www.loksatta.com/mumbai/marijuana-worth-rs-4-crore-seized-mumbai-print-news-amy-95-3107845/