मुंबई बातम्या

मुंबई : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या दुचाकीमधील स्फोट अपघाती – Loksatta

मालेगाव येथे २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्यातील आरोपी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या दुचाकीमध्ये भिक्कू चौकाजवळ झालेला स्फोट अपघाती असल्याचा आरोप बचाव पक्षाने केला आहे. स्फोटके दुचाकीच्या आसनाच्या खाली ठेवण्यात आली होती का याबाबत संदिग्धता असून आणि स्फोट अपघाती असू शकतो, अशी शक्यता न्यायवैद्यक तज्ज्ञांनी वर्तवली होती. त्याचाच आधार घेऊन पोलिसांनी साध्वी यांच्या दुचाकीत स्फोटके ठेवल्याचा आरोप बचाव पक्षाने केला आहे.

हेही वाचा >>> महिलेला मारहाण करणाऱ्या ‘त्या’ पदाधिकाऱ्यावर मनसेची मोठी कारवाई; घेतला ‘हा’ निर्णय!

न्यायवैद्यक तज्ज्ञाने घटनास्थळी जाऊन दुचाकी व गुन्ह्याशी संबंधित इतर साहित्याची वैज्ञानिक पाहणी केली होती. त्याला तपास यंत्रणेने साक्षीसाठी पाचारण केले होते. त्यावेळी त्याने दुचाकीसह घटनास्थळावरून सापडलेल्या साहित्याची ओळख पटवली होती. मात्र उलटतपासणीच्या वेळी स्फोटके दुचाकीच्या आसनाखाली ठेवण्यात आल्याचे शास्त्रोक्तरीत्या सांगता येणार नाही, असे सांगितले होते. स्फोटक दुचाकीच्या आसनाच्या खाली ठेवण्यात आली असावीत असा आपला अंदाज होता हे म्हणणे बरोबर आहे. मात्र त्याचा कुठलाही पुरावा आपल्याला सापडलेला नाही, असेही त्याने सांगितले होते.
घटनास्थळाची पाहणी करताना स्फोटाचा केंद्रबिंदू सापडला नसल्याचेही या न्यायवैद्यक तज्ज्ञाने उलटतपासणीत सांगितले होते. तसेच स्फोटासाठी नेमकी कोणती स्फोटके वापरण्यात आली हे सांगणे कठीण असल्याचे सांगताना हा स्फोट अपघाती असू शकतो, अशी शक्यता या तज्ज्ञाने व्यक्त केली होती. हाच धागा पकडून स्फोटके दुचाकीत ठेवली गेली असावीत, असा आरोप बचाव पक्षाने केला आहे.

Source: https://www.loksatta.com/mumbai/sadhvi-pragyasinh-thakur-bike-explosion-accidental-mumbai-print-news-amy-95-3107796/