मुंबई बातम्या

भाजपचे आता ‘मिशन मुंबई’; अमित शहांच्या दौऱ्याने महापालिका निवडणुकीसाठी ठरणार रणनीती – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः लालबागचा राजा, तसेच सिद्धिविनायक या प्रमुख गणपतींचे दर्शन घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा ५ सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. याच दौऱ्यादरम्यान भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजप ‘मिशन मुंबई महापालिका’चा शुभारंभ करणार असल्याचे कळते. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखण्यासाठीच अमित शहा यांच्या नेतृत्वात बैठक घेतली जाणार असल्याचे कळते.

राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून अमित शहा लालबागचा राजाच्या दर्शनाला येतात. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये करोनामुळे त्यांना दर्शन घेता आले नव्हते. मात्र, यंदा गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याने ५ सप्टेंबरला ते लालबागचा राजा, तसेच सिद्धिविनायकाचे दर्शन घेतील. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्या गणपतीचेही दर्शन घेणार आहेत. विशेष म्हणजे, शहा या दरम्यानच मुंबई महापालिकेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण बैठक घेणार असल्याचे समजते. गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून ती काबीज करण्यासाठी भाजप यावेळी खूपच मेहनत घेत आहे. त्याच दृष्टीने त्यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने ‘मिशन मुंबई महापालिका’चा शुभारंभ होणार असल्याचे समजते. मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असल्याचे कळते.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/amit-shah-to-meet-top-bjp-leaders-in-mumbai-ahead-of-civic-body-polls/articleshow/93937653.cms