मुंबई बातम्या

गणेशभक्तांसाठी गुड न्यूज; विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई लोकलबाबत घेतला मोठा निर्णय – Maharashtra Times

मुंबई: गणेशोत्सवाच्या आगमनाची तयारी पूर्ण झालेली असताना मध्य आणि पश्चिम रेल्वेने अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर ९ सप्टेंबरला मध्यरात्री विशेष लोकल चालवण्याची तयारी सुरू केली आहे. ९ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. दादर, गिरगाव चौपाटीवर विसर्जन सोहळा पाहण्यासाठी लाखो नागरिक येतात.

उत्सवकाळातील गर्दीमुळे गणरायाचे दर्शन घेणे शक्य होत नाही, असे भाविक विसर्जनाच्या दिवशी दर्शन घेण्याचे नियोजन करतात. या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलदरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा या विशेष लोकल फेऱ्या धावणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरारदरम्यान लोकल फेऱ्या असतील. रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी हा निर्णय घेण्यात आला. येत्या काही दिवसांत अतिरिक्त लोकल फेऱ्यांच्या वेळेची घोषणा करण्यात येणार आहे, असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/extra-mumbai-local-will-run-for-immersion-ceremony-in-mumbai/articleshow/93891409.cms