मुंबई बातम्या

मिशन बीएमसी: अधिवेशनात 29 पैकी 15 घोषणा मुंबईशी संबंधित!; सत्ताधाऱ्यांची नजर मुंबई मनपावर – दिव्य मराठी

औरंगाबाद / महेश जोशी16 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

विधिमंडळाचे अधिवेशन संपूर्ण राज्याचे प्रश्न मांडून त्यावर उपाययोजना करण्यासाठी असते. मात्र, नुकतेच पार पडलेले पावसाळी अधिवेशन मुंबईकेंद्रित असल्याचे दिसून आले. एकूण 29मोठे निर्णय आणि घोषणांपैकी 15 एकट्या मुंबईसाठी करण्यात आल्या. गोविंदांना नोकऱ्यांत आरक्षण ते पालिकेतील सफाई कामगारांना घर देण्यासारखे तब्बल दीड डझन निर्णय व घोषणा मुंबईशी संबंधित होत्या. पालिकेतील भ्रष्टाचाराची कॅगमार्फत चौकशी करून शिवसेनेला घेरण्याचा सरकारने प्रयत्न केला. यामुळे शिंदे-फडणवीस यांचे पुढचे लक्ष्य मिशन बीएमसी असल्याचे चर्चा आहे. यंदा अवघे 6 दिवस अधिवेशन पार पडले. पुरवणी मागण्यांच्या विधेयकांसह 10 विधेयके मंजूर करण्यात आली. एकूण 57 तास 25 मिनिटे कामकाज चालले.

गोविंदांना नोकऱ्यात आरक्षण
दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आला. गोविंदांनाही सरकारी नोकरीत ५% आरक्षण मिळेल. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या गोविंदांना खेळाचे ग्रेस मार्क मिळतील. दहीहंडी आणि गोविंदा हे प्रामुख्याने मुंबईत असल्याने पालिकेत या निर्णयाचा फायदा हाेऊ शकतो.

मृत व जखमी गोविंदांना मदत
गोविंदा पथकातील खेळाडूचा पडून मृत्यू झाल्यास वारसाला १० लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्यात येईल. दोन्ही डोळे-हात-पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे २ अवयव निकामी झाल्यास त्याला ७.५० लाख देण्यात येतील.

29 हजार सफाई कामगारांना घरे
मुंबई पालिकेतील २९,८१६ सफाई कामगारांना पुढील दोन वर्षांत ३०० चौरस फुटांची घरे दिली जातील. पहिल्या टप्प्यात १२ हजार कामगारांना सदनिका मिळतील. २००८ पासून सुरू झालेली ही योजना आता प्रत्यक्षात येत आहे.

प्रभाग रचनेची एसीबी चौकशी
दर १० वर्षांनी लोकसंख्येची मोजणी होते आणि त्यानुसार प्रभागाचे क्रमांक वाढवले जातात. मुंबई पालिकेत २० टक्के लोकसंख्येला ६ प्रभाग तर ३.८ टक्के लोकसंख्येला ९ प्रभाग वाढवले. ही विसंगती असून प्रभाग रचनेविरोधात ८९२ तक्रारी आल्या आहेत. प्रभाग रचनेतील घोटाळ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशीची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात केली.

पालिकेच्या शाळेतही घोटाळा
मुंबई महापालिकेच्या ४८० शाळांत व्हर्च्युअल क्लासरूम चालवण्यासाठी काढलेल्या निविदेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला. याच्या चौकशीची मागणी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली. त्याबाबतच्या तक्रारी लाचलुचपत विभागाकडेही देण्यात आल्या आहेत.

पालिकेतील भ्रष्टाचाराची कॅगमार्फत चौकशी
मुंबई महानगरपालिकेत काही कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून सर्वसामान्य जनतेचा पैसा चुकीच्या पद्धतीने वळवण्यात आल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. रस्ते, कोविड सेंटर, इमारती यात मोठा घोटाळा झाल्याचे सांगत या प्रकाराची विशेष ‘कॅग’ नेमून चौकशीची घोषणा त्यांनी केली.

मुंबईकेंद्रित इतर घोषणा आणि निर्णय
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची केंद्राकडे शिफारस करण्याचा ठराव
३ वर्षांत मुंबई पालिकेतील रस्ते काँक्रीटचे करणार, धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्णत्वास नेणार, गिरणी कामगारांना ५० हजार सदनिका दिल्या जाणार
मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासाबाबत विशेष विकास नियंत्रण नियमावली. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी आवश्यकतेनुसार निधी. चाळीतील पोलिसांना १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काचे घर
मेट्रो मार्ग ५ चा विस्तार, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम युद्धपातळीवर करण्यात येणार.

बातम्या आणखी आहेत…

Source: https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/15-out-of-29-announcements-in-the-convention-related-to-mumbai-but-the-eyes-of-the-rulers-are-on-the-mumbai-municipality-130242050.html