मुंबई बातम्या

Mumbai News : मुंबई महापालिकेला लवकरच नवे आयुक्त मिळण्याची शक्यता, आगामी निवडणुकीच्या – ABP Majha

Mumbai News : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असा नावलौकिक असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेला (Mumbai Municipal Corporation) लवकरच नवे आयुक्त (BMC Commissioner) मिळण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेचे विद्यमान आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांच्या कार्यपद्धतीवर शिंदे-फडणवीस सरकार नाराज आहे. त्यामुळेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पालिकेत मोठे फेरबदल होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी अनेक अधिकाऱ्यांची लॅाबिंग सुरु झाली आहे. 

महाविकास आघाडी सरकारने इक्बाल सिंह चहल यांना मुंबई महापालिकेची जबाबदारी दिली होती. 8 मे 2020 मध्ये म्हणजेच कोविडच्या काळात चहल यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर आता मुंबई महापालिकचे आयुक्त देखील बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकार त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचं समजतं. महत्त्वाचं म्हणजे इक्बाल सिंह चहल यांनी गेल्या दोन दिवसांत दोन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली होती. 

प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली आणि इक्बाल सिंह चहल यांची नियुक्ती
2020 मध्ये भारतात  कोविड -19 चा शिरकाव झाला आणि सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले. मुंबईत कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक असतानाच तत्कालीन महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली करुन त्यांच्या जागी इक्बाल चहल यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबईत कोरोनाला रोखण्यात प्रवीण परदेशी अपयशी ठरल्याने त्यांची बदली करुन चहल यांची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती केल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती

कोण आहेत इक्बाल सिंह चहल?

– इक्बाल सिंह चहल हे 1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 8 मे 2020 रोजी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी त्यांची वर्णी लागली होती.  त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. विविध पदांवर काम करताना त्यांनी धडाकेबाज कामगिरी केली असल्याचं बोललं जातं. 

– प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव असलेले इक्बाल सिंह चहल हे मुंबई महापालिका आयुक्तपदी विराजमान होण्यापूर्वी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव होते. जलसंपदा विभागातही त्यांनी प्रधान सचिव म्हणूनही काम केलं आहे. 

– धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची धुरा त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिवपदीही त्यांनी काम केले असून, औरंगाबाद आणि ठाण्याचे जिल्हाधिकारीही होते. 

– राजस्थानच्या जोधपूरमध्ये शिक्षण घेतलेल्या इक्बाल सिंह चहल यांनी म्हाडाचे अध्यक्षपद, उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

– मुंबईत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झालेला असताना त्यावेळी मुंबई महापालिकेने प्रचंड मोठं आणि महत्त्वाचं काम केलं. कोरोना काळात मुंबईत अनेकांचा मृत्यू झाला. परंतु त्याच वेळी कोट्यवधी नागरिकांना वाचवण्यात मुंबई महापालिकेला यश आलं. या दरम्यान महापालिकेचं नेतृत्व करणाऱ्या इक्बाल सिंह चहल यांची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरली

– काही महिन्यांपूर्वी इक्बाल सिंह चहल यांची केंद्रात सचिवपदी बदली केल्याची चर्चा रंगली होती. परंतु चहल यांची केंद्रात बदली झालेली नसून त्यांना केंद्रीय सचिव पदासाठी पात्र असल्याबाबतचं नियुक्ती पत्र प्राप्त मिळालं होतं.  त्यामुळे ते मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणूनच सध्या कार्यरत आहेत.

Source: https://marathi.abplive.com/news/mumbai/mumbai-municipal-corporation-is-likely-to-get-a-new-commissioner-soon-as-shinde-fadnavis-government-is-unhappy-with-iqbal-singh-chahal-1093399