मुंबई बातम्या

मुंबई : मेट्रो ५’ची धाव शहाड-टिटवाळ्यापर्यंत? ; एमएमआरडीए तपासणार व्यवहार्यता – Loksatta

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५’ प्रकल्पाचे काम हाती घेतले असून ही मेट्रो पुढे कल्याणऐवजी शहाड-टिटवाळ्यापर्यंत धावण्याची शक्यता आहे. ‘मेट्रो ५’ मार्गिकेचा शहाड वा टिटवाळ्यापर्यंत विस्तार करण्याची सूचना राज्य सरकारने एमएमआरडीएला दिली असून एमएआरडीएने विस्तारीकरणाची व्यवहार्यता तपासण्याचा निर्णय घेतला आहे. विस्तारीकरण व्यवहार्यतेच्या निश्चितीनंतर ‘मेट्रो ५’ शहाड-टिटवाळ्यापर्यंत नेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

ठाणे – कल्याण प्रवास सुकर आणि वेगवान करण्यासाठी एमएमआरडीएने ठाणे-भिवंडी-कल्याण ‘मेट्रो ५’ मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. सुमारे २४.९ किमी लांबीच्या या मार्गिकेचे काम सध्या वेगात सुरू असून ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास ५० ते ७५ टक्के वेळ वाचेल, असा दावा एमएमआरडीएने केला आहे. आता या मार्गिकेचा कल्याणपासून पुढे शहाड किंवा टिटवाळ्यापर्यंत विस्तार करण्याची शक्यता आहे.

मेट्रो मार्गिकांची गरज, नागरिकांची मागणी लक्षात घेऊन विस्तारीकरण करण्यात येत आहे. त्याप्रमाणे ‘मेट्रो ५’च्या विस्तारीकरणाचाही विचार सुरू आहे. सरकारने विधानसभेत याबाबतची माहिती दिली असून आता एमएमआरडीतर्फे ‘मेट्रो ५’चे विस्तारीकरण शक्य आहे का? याचा अभ्यास करण्यात येईल, अशी माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. सध्या हा विषय प्राथमिक स्वरूपात आहे. त्यामुळे याची व्यवहार्यता तपासल्यानंतरच या विस्तारीकरण प्रकल्पाचे भवितव्य ठरेल असेही ते म्हणाले.

मेट्रो ५

ठाणे-भिवंडी-कल्याण मार्गिका
एकूण लांबी २४.९ किमी
१५ मेट्रो स्थानके
पूर्णतः उन्नत मार्ग

भविष्यात कल्याणपासून पुढे शहाड-टिटवाळ्यापर्यंत विस्ताराचे नियोजन

८४१६.५१ कोटी रुपये खर्च

Source: https://www.loksatta.com/mumbai/mumbai-metro-5-run-up-to-shahad-titwala-mumbai-print-news-amy-95-3092567/