मुंबई बातम्या

एकाच वर्षात 400 हून अधिक पीएचडीधारक! आयआयटी बॉम्बे ठरली देशातील पहिली शैक्षणिक संस्था – Lokmat

मुंबई :

एकाच वर्षी तब्बल ४०० हून अधिक पदवीधर संशोधक देणारी आयआयटी बॉम्बे ही देशातील पहिली शैक्षणिक संस्था ठरली आहे. यंदा आयआयटी बॉम्बेतून तब्बल ४४९ विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. यामुळे स्टेम शिक्षणातील (सायन्स, टेक्नॉलॉजी, अभियांत्रिकी, गणित) हा एक मैलाचा दगड ठरला आहे. आयआयटी बॉम्बेचा ६० वा दीक्षांत समारंभ शनिवारी पार पडला. 

कोविड पूर्वकाळातील वातावरण, कोविडकाळातील अडचणी – समस्या आणि कोविडकाळानंतर येणाऱ्या संधी असे ३ विविध टप्पे पाहिलेली यंदाची पदवीची बॅच असल्याने आयआयटी बॉम्बेचे संचालक शुभाशीष चौधरी यांनी पदवीधर विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

आयआयटी बॉम्बेच्या ६० व्या दीक्षांत समारंभात २ हजार ३२४ विद्यार्थ्यांना एकूण २ हजार ५५१ पदव्या बहाल करण्यात आल्या. आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शविली. तुम्ही सगळे भारताचे भविष्य असून आज तुम्ही तुमची शैक्षणिक पात्रता पदवी प्राप्त करून सिद्ध केली आहे, आता या जगातील माणुसकीला बळकटी देणे आणि ती कायम राखण्याची जबाबदारी तुमची असल्याचे बिर्ला यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. 

दीक्षांत समारंभात ३५ संशोधक विद्यार्थ्यांची नाईक आणि रस्तोगी सर्वोत्कृष्ट  पीएचडी प्रबंध पुरस्कारासाठी ३० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सर्वोत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी ४ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके बहाल करण्यात आली. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग शाखेच्या मोहम्मद अली रेहान याला प्रेसिडेंट ऑफ इंडिया मेडलने सन्मानित करण्यात आले. 
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाच्या कौस्तुव जाना याला २०२०-२१ साठी तर अर्यमान मिथानी याला २०२१-२२ साठी इन्स्टिट्यूट गोल्ड मेडलने सन्मानित करण्यात आले.  
कॉम्प्युटर सायन्स आनंद इंजिनिअरिंग विभागाच्या श्रेया पथक हिला डॉ. शंकर दयाल शर्मा  गोल्ड मेडल बहाल करण्यात आले. 

आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी काळात संस्थेकडून देण्यात आलेले प्रशिक्षण नक्कीच सक्षम नेतृत्व घडविण्यात मदत करेल. देशाच्या गरजा ध्यानात घेऊन हे विद्यार्थी नक्कीच शैक्षणिक व कॉर्पोरेट क्षेत्रात आपले योगदान देतील. 
– प्रा. शुभाशीष चौधरी, संचालक, आयआयटी बॉम्बे 

Web Title: More than 400 PhD holders in a single year IIT Bombay became the first educational institution in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Source: https://www.lokmat.com/education/more-than-400-phd-holders-in-a-single-year-iit-bombay-became-the-first-educational-institution-in-the-country-a681/