मुंबई बातम्या

मुंबई-ठाण्याला पावसाने झोडपले, उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी साचले पाणी; नागरिकांची त्रेधातिरपीट – Lokmat

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात श्रावणसरींची उघडझाप सुरू असतानाच मंगळवारी सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत कोसळलेल्या दमदार सरींनी मुंबईकरांना अक्षरश: झोडपून काढले. विशेषत: शहराच्या तुलनेत पूर्व आणि पश्चिम उपनगरांत पावसाचा जोर अधिक असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. त्यात वेगाने वाहणारा वारा भर घालत असल्याने मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाल्याचे चित्र होते.

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत सकाळी दहा वाजता सुरू झालेला पाऊस दुपारी अडीच वाजेपर्यंत कोसळत होता. पश्चिम उपनगरांतील काही ठिकाणांसह ठाणे आणि कल्याण येथे ७० ते १०० मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. पहाटे रिमझिम कोसळणाऱ्या पावसाने सकाळ होताच रौद्ररूप धारण केले. मुंबईवर काळोख पसरला होता. सायन, वांद्रे, कुर्ला, सांताक्रूझ, विद्याविहार, चेंबूर, घाटकोपर, साकीनाका, बोरिवली, कांदिवली, गोरेगावसह लगतच्या परिसरात काळोख दाटून आला असतानाच सातत्याने वाऱ्याच्या वेगाने पाऊस कोसळत होता. तिरप्या सरी आणि वाऱ्यामुळे छत्रीचा टिकाव लागत नव्हता. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पावसाचे पाणी साचले नसले तरी वाहतुकीचा वेग कमी झाला होता. दुपारपर्यंत सर्वसाधारण असणारी ही परिस्थिती नंतर मात्र पूर्ववत झाल्याचे चित्र होते.

जोरदार पावसामुळे रेल्वे वाहतुकीला फटका बसला. लोकलला लेटमार्क लागला तर डेक्कन क्वीनच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला. मध्य रेल्वेवर लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. पुणे येथून सीएसएमटीला येणाऱ्या डेक्कन क्वीनच्या इंजिनात बिघाड झाल्याने ही गाडी ठाणे स्थानकात १०. २४ वाजता थांबविण्यात आली होती. रेल्वे कर्मचाऱ्यांनी ते इंजिन तात्पुरते सहाव्या मार्गिकेने विद्याविहारला नेले. विद्याविहार येथे आणखी एक इंजिन लावून साडेबारा वाजता गाडी सीएसएमटीकडे रवाना झाली. 

Web Title: Rain lashed Mumbai-Thane, water accumulated in many places in suburbs; Citizens riot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Source: https://www.lokmat.com/mumbai/rain-lashed-mumbai-thane-water-accumulated-in-many-places-in-suburbs-citizens-riot-a309/