मुंबई बातम्या

मुंबई : मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक ; पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची ब्लॉकमधून सुटका – Loksatta

विविध अभियांत्रिकी कामांसाठी रविवार, १४ ऑगस्टला मध्य रेल्वेच्या सीएसएमटी- विद्याविहार या स्थानकादरम्यान आणि कुर्ला- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र रविवारी पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नाही. मुंबई सेंट्रल आणि माहीम दरम्यान दोन्ही जलद मार्गावर शनिवारी मध्यरात्री चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर सीएसएमटी – विद्याविहार दरम्यान अप आणि धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक असेल. त्यामुळे सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या लोकल सीएसएमटी-विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकावर थांबतील. पुढे पुन्हा डाउन धिम्या मार्गावर वळवल्या जातील.

घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील लोकलही विद्याविहार आणि सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात लोकल थांबतील.

हार्बरवर कुर्ला-वाशी दोन्ही मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक आहे. सीएसएमटी येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ या वेळेत पनवेल, बेलापूर, वाशी करीता जाणाऱ्या लोकल आणि वाशी बेलापूर, पनवेल येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या अप लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी- कुर्ला आणि वाशी- पनवेल स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील. पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल-माहीम दरम्यान दोन्ही जलद मार्गावर शनिवारी मध्यरात्री 12 ते रविवारी पहाटे चारपर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे या दोन स्थानकादरम्यान लोकल जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर मात्र मेगाब्लॉक नाही

Source: https://www.loksatta.com/mumbai/mumbai-mega-block-on-central-railway-on-sunday-mumbai-print-news-amy-95-3069152/