मुंबई बातम्या

मुंबई : डॉकयार्ड रोड येथे ४० वर्षीय व्यक्तीची हत्या – Loksatta

डॉकयार्ड रोड येथे एका व्यक्तीची शनिवारी हत्या करण्यात आली. याप्रकरणी भायखळा पोलीस अधिक तपास करत आहेत. डोक्यात दगड घालून या व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

डॉकयार्ड रोड येथील गोदरेज केबिन परिसरात शनिवार पहाटे ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. वासिम शेख(४०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी नुरा नावाच्या एका व्यक्तीविरोधात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

तक्रारदार अब्दुल कादीर अयुब वाघु(३९) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. अब्दुल त्यांचे मित्र कासिम शेख व शाहरुख मोमीन यांच्यासोबत बसले होते. त्यावेळी गोदरेज केबिन येथे मोठा दगड पडल्याचा आवाज झाला. त्यांनी तेथे धाव घेतली असता एक व्यक्ती तेथून बाहेर आली व जीन्यावरून चढून डॉकयार्ड स्थानकात गेली. त्यांनी आत जाऊन पाहिले असता वासिम शेखच्या डोक्यावर मोठी जखम होती. त्यातून रक्त वाहत होते. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन वासिमला जे.जे. रुग्णालयात नेले. पण तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी याप्रकरणी नूरा नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Source: https://www.loksatta.com/mumbai/mumbai-a-40-year-old-man-was-killed-at-dockyard-road-mumbai-print-news-amy-95-3069150/