मुंबई बातम्या

मुंबई : केवळ कारशेडमुळे नाही तर तांत्रिक कारणांमुळे मेट्रो ३ महागली ; २०१८ पासून खर्चात वाढ – Loksatta

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेच्या कारशेडचे काम रखडल्याने खर्चात १० हजार २७० कोटींची वाढ झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मात्र खर्च वाढण्यामागे कारशेड हेच एकमेव कारण नसून अनेक कारणे असल्याचे मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) सांगितले. प्रकल्पाचे नियोजन आणि प्रत्यक्ष कामास सुरूवात होण्यास बराच वेळ गेल्याने तसेच मुंबईसारख्या शहरात भुयारी मेट्रो मार्गिकेचे काम सुरू करणे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असल्याने खर्च वाढल्याचेही स्पष्ट केले आहे. मेट्रो ३ च्या प्रकल्प खर्चातील ही वाढ २०१८ पासून सुरू झाली असून ही वाढ २०२१ पर्यंतची आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत यात आणखी वाढ होण्याचीही शक्यता आहे.

दक्षिण मुंबई आणि उपनगरांना मेट्रोने जोडण्यासाठी ३३.५ किमीची भुयारी मेट्रो मार्गिका हाती घेण्यात आली. मुळात २३ हजार १३६ कोटींचा हा प्रकल्प आता ३३ हजार ४०५ कोटींचा झाला आहे. मेट्रो ३ च्या अतिरिक्त खर्चाला मान्यता दिल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी अडीच वर्ष प्रकल्प, कारशेड़चे काम रखडल्याने खर्चात वाढ झाल्याचे सांगितले. मात्र खर्च वाढण्यामागे कारशेड हेच एकमेव कारण नसून या इतर अनेक कारणे असल्याची माहिती गुरूवारी एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. मेट्रो ३ मार्गिकेचे नियोजन (आराखडा) २०११ मध्ये करण्यात आले. दिल्ली मेट्रो रेलच्या मेट्रो कामाच्या धर्तीवर १० टक्क्यांची वाढ करून मेट्रो ३ चा अंदाजित खर्च निश्चित करण्यात आला. या प्रकल्पाला २०१४ मध्ये मान्यता मिळाली आणि प्रत्यक्षात प्रकल्पाचे कार्यादेश २०१६ मध्ये निघाल्यानंतर एमएमआरसीने कामाला सुरूवात केली. कामाला सुरूवात झाल्यापासून पाच वर्षात २०२१ पर्यंत काम पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र मुंबईसारख्या शहरात भुयारी मार्गाचे काम करणे अत्यंत आव्हानात्मक आहे. दिल्लीच्या धर्तीवर मेट्रो ३ चा खर्च निश्चित करण्यात आला, पण प्रत्यक्षात काम करताना त्यात वाढ झाली. तसेच मेट्रो ३ ची स्थानके अनेक ठिकाणी इतर मेट्रो स्थानकाशी जोडली जात आहेत. त्यामुळेही खर्च वाढला, असे भिडे यांनी सांगितले.

अतिरिक्त खर्चाचा प्रस्ताव लवकरच केंद्राकडे
मेट्रो ३ च्या खर्चात १० हजार २७० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. त्यानुसार सुधारित ३३ हजार ४०५ कोटींच्या खर्चास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मात्र आता यासाठी केंद्राचीही मंजुरी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आता यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल. केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर जायकाकडून ६६०० कोटींचा निधी (कर्ज) घेण्यात येईल, असेही भिडे यांनी यावेळी सांगितले.

मेट्रो ३ च्या कामावर आतापर्यंत २१ हजार ५२० कोटी खर्च
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेचा प्रस्तावित खर्च २३ हजार १३६ कोटी आहे. त्यापैकी आतापर्यंत एमएमआरसीला २१ हजार ८९० कोटी रुपये इतका निधी उपलब्ध झाला आहे. यातील २१ हजार ५२० कोटी रुपये खर्च आतापर्यंत करण्यात आल्याचे भिडे यांनी सांगितले.

Source: https://www.loksatta.com/mumbai/metro-3-became-expensive-not-only-because-of-carshed-but-also-because-of-technical-reasons-mumbai-print-news-amy-95-3067926/