मुंबई बातम्या

पुन्हा करोनाचा धोका :नागरिकांनी स्वत:हून नियम पाळावे ; मुंबई महानगरपालिकेचे आवाहन – Loksatta

मुंबईमधील दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत बुधवारी अचानक दुप्पटीने वाढ झाल्यामुळे यंत्रणांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर उत्सव काळात होणाऱ्या गर्दीमुळे करोना संसर्गाचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे किंवा मुखपट्टीचा वापर करावा, सर्दी-खोकल्याचा त्रास होत असलेल्यांनी स्वत:हून विलगीकरणात राहावे, नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीची वर्धक मात्रा घ्यावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि त्यानंतर करोनाबाधितांची संख्या वाढतच गेली. करोना संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी लागू झाली. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होताच टप्प्याटप्प्याने टाळेबंदी शिथिल करण्यात आली. मात्र करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्यामुळे कठोर निर्बंध लागू करण्यात आले. मात्र करोना संसर्ग कमी होऊ लागताच टप्प्याटप्प्याने कठोर निर्बंधही हटविण्यात आले. करोना संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे राज्य सरकारने यंदा दहीहंडी, गणेशोत्सव आदी उत्सवांवरील निर्बंध हटविले आहेत. परिणामी, यंदा निर्बंधमुक्त वातावरणात सर्व उत्सव पार पडणार आहेत. त्यामुळे गोविंदा पथके, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे.

मुंबईत पुन्हा एकदा करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. बुधवारी एका दिवसातच दैनंदिन रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली. पुढील आठवड्यात दहीहंडी आणि ऑगस्टच्या अखेरीस गणेशोत्सव होत आहे. उत्सव काळात होणाऱ्या गर्दीमुळे करोना संसर्गाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच सध्या कोसळणारा मुसळधार पाऊस आणि त्यानंतर मध्येच पडणारे कडक ऊन यामुळे अनेकांना ताप, सर्दी, खोकला, अंगदुखीचा त्रास होत आहे. परिणामी, करोना आणि साथीच्या आजारांचा धोका वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी स्वत:हून काळजी घेणे गरजेचे आहे, असे मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्या करोना प्रतिबंधक लसीची वर्धक मात्र विनाशुल्क उपलब्ध आहे. मात्र अनेकांनी अद्याप ती घेतलेली नाही. करोना संसर्ग वाढीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वर्धक मात्र घ्यावी, असे आवाहन वारंवार मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. दहीहंडी उत्सव वा गणेशोत्सवावर यंदा कोणतेही करोनाविषयक निर्बंध नाहीत. मात्र पथके आणि मंडळांनी स्वत:हूनच बंधने पाळून आपल्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना स्वत:हून काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, अगदीच आवश्यक असल्यास मुखपट्टीचा वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी वावरताना शक्यतो सामाजिक अंतर राखण्याचा प्रयत्न करावा, हाताची स्वच्छता करावी. सध्या विनाशुल्क करोना प्रतिबंधक लसीची वर्धक मात्र देण्यात येत आहे. नागरिकांनी ही वर्धकमात्रा घ्यावी. त्याचबरोबर १२ ते १४ आणि १४ ते १७ वयोगटांतील मुलांचे लसीकरण करावे. करोनाविषयक नियमांचे स्वत:हून पालन करून स्वत:ची आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. –डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महानगरपालिका.

Source: https://www.loksatta.com/mumbai/corona-threat-again-citizens-should-follow-the-rules-by-themselves-mumbai-print-news-amy-95-3067269/