मुंबई बातम्या

आता मुंबई महानगरपालिका लक्ष्य! उत्तर भारतीय आणि बिहारी मतांसाठी भाजपचे ‘यूपी कार्ड’ – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी,मुंबई

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने ‘उत्तर भारतीय’ कार्ड बाहेर काढले आहे. मुंबईत अद्याप फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी का होत नाही, असा सवाल करत आमदार राजहंस सिंह यांनी याप्रश्नी उत्तर भारतीयांच्या शिष्टमंडळासह पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांची भेट घेतली. धोरणाची अंमलबजावणी न करता फेरीवाल्यांवर कारवाई केली जात असून ते चुकीचे आहे, ही कारवाई त्वरित थांबवावी, अशी विनंती राजहंस यांनी आयुक्तांना केली आहे.

सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारने सन २०१४मध्ये फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीचे निर्देश राज्य सरकारला दिले. मात्र तब्बल आठ वर्षांनंतरही मुंबई महापालिका उदासीन आहे, असा दावा भाजपने केला आहे. धोरणाची अंमलबजावणी न करता फेरीवाल्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे, याची आठवण करून देण्यासाठी राजहंस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, उत्तर भारतीय मोर्चाचे मुंबई अध्यक्ष जयप्रकाश सिंह, प्रवक्ते उदयप्रताप सिंह, प्रदीप त्रिपाठी, रमाकांत गुप्ता, आदित्य दुबे आणि आझाद हॉकर्स युनियनचे अध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी आयुक्तांची पालिका मुख्यालयात भेट घेतली.

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने मराठी कट्टा सुरू केला आहे तर दुसरीकडे उत्तर भारतीय आणि बिहारी मते एकवटण्यासाठी पक्षातील उत्तर भारतीय गटाने कंबर कसली आहे. काँग्रेसकडून ‘यूपी कार्ड’साठी प्रयत्न सुरू होण्याआधीच भाजपने ही मते आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे सांगितले जाते आहे. फेरीवाला धोरण प्रत्यक्षात न आणताच फेरीवाल्यांवर वारंवार कारवाई केली जाते आहे. धोरणाची तत्काळ अंमलबजावणी करून पात्र फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याची तसेच सर्व पात्र फेरीवाल्यांना परवाने देण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

पुन्हा फेरीवाल्यांचे बस्तान

मुंबई, ठाणे यासह मोठ्या शहरांमध्ये फेरीवाल्यांची कायम मुजोरी असते. उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानकापासून १५० मीटरपर्यंतच्या अंतरात फेरीवाल्यांना बसवण्यास मनाई केली आहे. दादर पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात काही दिवसांपूर्वीच मोठी कारवाई करून परिसर फेरीवाला मुक्त करण्यात आला होता. मात्र पालिकेच्या पथकाची पाठ फिरताच फेरीवाले पुन्हा येत असल्याचे आढळून आले आहे. मुंबईत रेल्वे स्थानक तसेच अन्य ठिकाणी फेरीवाल्यांनी मोकळ्या जागा, रस्ते, फूटपाथवर अतिक्रमण केले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दादर, माटुंगा, कुर्ला, अंधेरी, बोरिवली, घाटकोपरसह अनेक रेल्वे स्थानक व इतर भागांत पुन्हा फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. याप्रकरणी नागरिकांकडून तक्रारी वाढू लागल्या आहेत.

– पालिकेने सन २०१४ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात : १ लाख २८ हजार ४४४ फेरीवाले

– संपूर्ण मुंबईतून आलेले फेरीवाल्यांचे अर्ज : ९९ हजार ४३५

– छाननीनंतर १५ हजार ३६१ फेरीवाले पात्र

– ४०४ मार्गांवर ३० हजार ८३२ फेरीवाले निश्चित

– अद्याप पात्र फेरीवाल्यांचे पुनर्वसन नाही.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/municipal-commissioners-meeting-for-hawker-policy-ahead-of-elections/articleshow/93465088.cms