मुंबई बातम्या

BMC Election 2022 : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे फटाके आता दिवाळीनंतरच?; वाढीव वॉर्ड संख्या रद्द… – TV9 Marathi

BMC Election 2022 : मुंबईतील वॉर्ड रचनेवर काँग्रेस आणि भाजप खूश नव्हती. शिवसेनेने आपल्याला सोयीची अशी वॉर्ड रचना केल्याचा आरोप काँग्रेस आणि भाजपने केला होता. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी तर या फेररचनेविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे फटाके आता दिवाळीनंतरच?

Image Credit source: tv9 marathi

मुंबई: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने मुंबई महापालिकेतील (bmc) नऊ वॉर्ड रद्द केले आहेत. त्यामुळे मुंबईतील (mumbai) वॉर्डांची संख्या 227 इतकीच झाली आहे. परिणामी निवडणूक आयोगाला आता पुन्हा नव्याने निवडणूक(election) प्रक्रिया करावी लागणार आहे. त्यात दीड ते दोन महिने लागणार आहेत. त्यामुळे येत्या ऑक्टोबरमध्ये होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक ही दिवाळीनंतरच होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ही निवडणूक डिसेंबरपर्यंत पुढे जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, इतर पालिकांच्या निवडणुका त्या आधीच होऊ शकतात असंही बोललं जात आहे. आधीच्या ठाकरे सरकारने मुंबईतील वॉर्डांची संख्या नऊने वाढवली होती. त्यामुळे मुंबईतील वॉर्डांची संख्या 227 वरून 236 झाली होती. शिंदे सरकारने ठाकरे सरकारचा हाच निर्णय फिरवला आहे.

मुंबई महानगरपालिका तसेच अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेत सध्याच्या 236 सदस्यांऐवजी 227 सदस्य संख्या होणार असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं. या आधी मुंबई महापालिकेची सदस्य संख्या 236 झाल्यानंतर वॉर्डांची फेररचना करण्यात आली होती.

[embedded content]

वॉर्ड निहाय आरक्षणही घोषित करण्यात आलं होतं. मात्र, कोर्टाने ओबीसी आरक्षणाला मान्यता दिल्यानंतर महापालिकेला पुन्हा एकदा आरक्षण सोडत काढावी लागली होती. आता राज्य सरकारने मुंबईतील वॉर्ड संख्या पूर्ववत केल्याने पुन्हा एकदा वॉर्डांची फेररचना करावी लागणार आहे. नव्याने आरक्षण सोडत काढावी लागणार आहे. या सर्व प्रक्रियेत आता दीड ते दोन महिने जाणार आहेत. त्यामुळे महापालिकेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार होती. ती डिसेंबरपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा

काँग्रेस आणि भाजपचा आरोप

मुंबईतील वॉर्ड रचनेवर काँग्रेस आणि भाजप खूश नव्हती. शिवसेनेने आपल्याला सोयीची अशी वॉर्ड रचना केल्याचा आरोप काँग्रेस आणि भाजपने केला होता. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी तर या फेररचनेविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी परवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुंबईतील वॉर्ड रचना रद्द करण्याची मागणी केली होती. ही वॉर्ड रचना सोयीची करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल राज्य सरकारने मुंबईतील वाढीव वॉर्डच रद्द केले आहेत. त्यामुळे आता निवडणूक कर्मचाऱ्यांना पुन्हा नव्याने वॉर्ड रचना करावी लागणार आहे. त्या प्रक्रियेत वेळ जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Source: https://www.tv9marathi.com/politics/mumbai-municipal-election-to-held-two-month-late-au29-774692.html