मुंबई बातम्या

एका महिन्यात मुंबईत ६७० किलो प्लास्टिक जप्त, ९ लाखांचा दंड – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मागील दोन वर्षांपासून थंडावलेली प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाई महापालिकेने यंदाच्या १ जुलैपासून पुन्हा धडाक्यात सुरू केली आहे. १ जुलै ते ३१ जुलै या महिनाभरात पालिकेच्या पथकाने मुंबईत १८ हजारापेक्षा अधिक ठिकाणी भेटी देऊन तपासणी केली. या कारवाईत तब्बल ६७० किलोहून अधिक प्लास्टिक जप्त करण्यात आले असून १७७ जणांकडून ८ लाख ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

करोना संकटामुळे दोन वर्षे प्लास्टिकविरोधातील कारवाई थांबली होती. मॉल, मंडया, दुकाने, फेरीवाले अशा गर्दीच्या ठिकाणी कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मुंबईत २६ जुलै २००५ रोजी आलेल्या महापुराला पिशव्या कारणीभूत ठरल्या होत्या. तसेच प्रत्येक वर्षी पावसाळ्यात पाणी तुंबण्यास विविध बाबींसह प्लास्टिकदेखील कारण ठरत असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर कडक निर्बंध घातले असून पालिकेला कारवाई वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.

सन २०१८मध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांची विक्री, वापर करणारे व उत्पादन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. कारवाईसाठी प्रशासनाने विशेष पथक नेमले असून परिमंडळनिहाय कारवाई केली जाते आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर पर्यावरणास हानीकारक असल्याने पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर वाढवावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार असल्याचे पालिकेचे उपायुक्त संजोग कबरे यांनी सांगितले.

या प्लास्टिकवर बंदी

५० मायक्रॉन प्लास्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या (हँडल असलेल्या व नसलेल्या), प्लास्टिकपासून बनवण्यात येणाऱ्या व एकदाच वापरून टाकून दिल्या जाणाऱ्या (डिस्पोजेबल) वस्तू उदा. ताट, कप, प्लेट, ग्लास, चमचे इत्यादी. हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू, द्रवपदार्थ साठवण्यासाठी वापरात येणारे कप/पाऊच, सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य इत्यादी साठवण्यासाठी व पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक आणि प्लास्टिक वेष्टण यावर बंदी घालण्यात आली आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/670-kg-plastic-seized-in-one-month-in-mumbai/articleshow/93284911.cms