मुंबई बातम्या

मुंबई विद्यापीठातील वसतिगृहाचे नामकरण पुन्हा राज्यपालांच्या कोर्टात – Lokmat

लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यपालांच्या सूचनेमुळे सुरू झालेला मुंबई विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाच्या नामकरणाचा वाद आता पुन्हा राज्यपालांच्या कोर्टात गेला आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी सोमवारी छात्रभारती आणि सर्व समविचारी संघटना प्रतिनिधींशी बोलताना वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्याची विद्यार्थ्यांची मागणी आणि त्यांच्या तीव्र भावना राज्यपालांपर्यंत लेखी पोहोचविण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे राज्यपालांपर्यंत विद्यार्थ्यांची मागणी कुलगुरूंमार्फत पोहोचल्यानंतर राज्यपाल काय निर्णय घेणार, आता याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

मुंबई विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव द्या, अशी सूचना राज्यपालांनी केली होती. त्याला आक्षेप घेत छात्र भारतीचे कार्याध्यक्ष रोहित ढाले यांनी छत्रपती शाहू महाराजांचे नाव दिले गेले पाहिजे, अशी मागणी केली होती. छात्रभारतीसह सर्वच समविचारी संघटनांनी ही मागणी उचलून धरली आणि सावरकरांच्या नावाला विरोध केला. 

मात्र मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने सावरकरांच्या नावाचा ठराव केल्यामुळे छात्र भारतीसह डाव्या आणि आंबेडकरी विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या होत्या. या सर्व विद्यार्थी संघटनांनी सोमवारी विद्यापीठात नामांतर परिषद घेण्याचे जाहीर केले होते. या असंतोषाची दखल घेत सोमवारी सकाळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी विद्यार्थी प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावले होते.  

संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याची विनंती 
 बैठकीत सर्वच विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा,  राज्यपाल, कुलगुरू आणि विद्यार्थी संघटनांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढावा. 
 याबाबत राज्यपालांना लेखी स्वरूपात कळवावे, अशी विनंती केली. बैठकीला सत्यशोधक विद्यार्थी संघटना, छात्र भारती, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना, रिपब्लिकन सेना आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
 कुलगुरूंनी राज्यपालांशी पत्रव्यवहार करण्याचे मान्य केले. कुलगुरूंच्या आश्वासनानंतर सोमवारची परिषद स्थगित करण्यात आली.

छत्रपती शाहू महाराजांचे यंदा स्मृतिशताब्दी वर्ष आहे. भारतात सर्वप्रथम विविध जाती-धर्मातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणारे ते पहिले राजे होते. यासाठी वसतिगृहाला त्यांचेच नाव दिले गेले पाहिजे, असा आमचा आग्रह कायम आहे.     – रोहित ढाले, कार्याध्यक्ष, छात्र भारती
 

Web Title: Naming of Mumbai University hostel again in Governor’s Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Source: https://www.lokmat.com/mumbai/naming-of-mumbai-university-hostel-again-in-governors-court-a607/