मुंबई बातम्या

‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चा ‘मान्सून शो’ – MahaMTB

‘बॉम्बे आर्ट सोसायटी’मार्फत दरवर्षी एक वार्षिक प्रदर्शन संपन्न होतच असते. मात्र, याहीपलीकडे जाऊन समिती सदस्यांनी निर्णय घेऊन या वर्षी ‘मान्सून शो’चे आयोजन करण्याचे ठरविले, ज्याची जबाबदारी शिल्पकार विक्रांत मांजरेकर यांच्याकडे सोपविण्यात आली. त्याविषयी सविस्तर…

मुंबईतील पावसाचा धुमाकूळ सर्वज्ञात आहे. जून-जुलै म्हणजे सरासरीपेक्षा अधिक मान्सून बरसणार असं हवामान खात्यानं सांगितलं. या काळातील मान्सूनमुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत होते. मात्र, या वर्षी मुंबापुरीत जुलै महिनाअखेर जो मान्सून बरसणार आहे, त्याने मात्र मुंबापुरीतील कलारसिकांना आनंदच होईल. कारण, या मान्सूनचं बरसणं म्हणजे रंगाकारांची उधळण आहे, विस्कळीतपणा तर सोडाच. परंतु, जर कुणी मानसिकदृष्ट्या विस्कळीत असेल, तर या ‘मान्सून’मधील रंगाकारांच्या रूपाकडे पाहून मनःशांती मिळेल, शांतीपूर्ण आनंद अनुभवता येईल.

 
art

काल प्रथितयश आणि प्रयोगशील शिल्पकार विक्रांत मांजरेकर यांचा फोन आला. त्यांनी म्हणजे, त्यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या ‘मान्सून शो’ मध्ये तब्बल 63 दृश्यकलाकारांनी सहभाग घेतला आहे. ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’ या दीर्घायुषी संस्थेने या ’शो’चे म्हणजे ‘दृश्यकला प्रदर्शना’चे आयोजन केले आहे. शिल्पकार विक्रांत यांनी सांगितले की, “द्विमित आणि त्रिमित दृश्यकलाकृती या प्रदर्शनात मांडलेल्या असून दोन्ही शैली व तंत्रात काम करणारे म्हणजे ‘पेंटर्स’ आणि ‘स्कल्पटर्स’ मिळून 63 जणांनी विनंतीला मान देऊन सहभाग घेतला आहे.” मुळात ’63’ हा अंकच असा आहे की, तो एकरूपता निर्माण करतो. ’36’ हा अंक नेहमीच नकारात्मक संदेश देतो. मात्र, ’3’ ने हे सारं सकारात्मक जुळवून आणलं आहे.

‘जहांगीर कलादालन’ जर ‘कलाकारांची पंढरी’ असेल, तर ’बांद्रा रिक्लमेशन’ वांद्रे पश्चिम येथील ’बॉम्बे मार्ग सोसायटी’चे कलादालन आता ’कलाकारांची आळंदी’ म्हणून नावारूपास येत आहे. आषाढीची दिंडी आणि समस्त वारकर्‍यांच्या दिंड्या या आळंदी येथूनच निघतात. (काही वगळता) तद्वतच कलाकारांना जर कलापंढरी गाठायची असेल, तर त्यांना ’बॉम्बे आर्ट सोसायटी‘च्या वांद्रे येथील कलादालनांमध्ये त्यांच्या कलाकृती प्रदर्शित करून रंगकारांच्या प्रदर्शाचा श्रीगणेशा करता येईल. कारण, ही कलादालने जहांगीर कलादालनाइतक्या प्रतीक्षेने मिळत नाहीत. लवकर उपलब्ध होऊ शकतात. ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’मार्फत दरवर्षी एक वार्षिक प्रदर्शन संपन्न होतच असते. मात्र, याहीपलीकडे जाऊन समिती सदस्यांनी निर्णय घेऊन या वर्षी ’मान्सून शो’चे आयोजन करण्याचे ठरविले, ज्याची जबाबदारी शिल्पकार विक्रांत मांजरेकर यांच्याकडे सोपविण्यात आली.

 
art

1888 पासून ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’, दृश्यकलाकारांच्या निवडक कलाकृतींची प्रदर्शने आयोजित करणारी, तसेच द्विशतकाकडे वाटचाल करणारी संस्था आहे. ‘मान्सून शो’ हा अधिकचा उपक्रम राबविताना साधारण तीन पिढ्यांचे साक्षीदार असलेल्या कलाकारांच्या कलाकृती मागविण्यात आल्या. या प्रदर्शनात प्रस्थापित नावांबरोबर फारसे प्रसिद्धीच्या झोतात नसलेले मात्र प्रयोगशील कलाकारदेखील त्यांच्या कलाकृतींच्या माध्यमातून उपस्थित आहेत. मग चित्रकार अनंत डेरेंची ‘चारकोल’ माध्यमातील, संस्कृतीदर्शक कलाकृती असो की, चित्रकार ज्ञानेश्वर जगदाळे यांची ‘अ‍ॅक्रेलिक’ रंग माध्यमातील कलाकृती असो. काहींना काहीतरी आशय घेऊन निर्माण झालेल्या या कलाकृती, त्या-त्या कलाकारांची उंची आणि प्रगल्भता कथन करीत असतात.

चित्रकर्ती जयश्री पाटणकर यांची ‘रति’नामक नैसर्गिक जलरंगातील कलाकृती एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. प्रयोगशील चित्रकार किशोर नारवडेकर यांची ‘एक चाय हो जाय’ या मथळ्याखालील ‘फिगरेटिव्ह’ शैलीतील कलाकृती ग्रामीण भारतीय दैनंदिनीतील ‘आयकॉन’ असलेल्या चहाच्या पेल्याला चित्रविषय करून जाते. जलरंगातील त्यांचे ‘फ्लो’ हे त्या चहाइतकीच तल्लफ निर्माण करतात. चित्रकर्ती कविता साळुंके यांचे ‘ऑईल’ रंगातील एका आजींचे ‘पोटेर्र्ट’ फारच बोलके आहे. रंगलेपन, चेहर्‍यावरील आणि मांडणी यावरुन चित्रकर्तीच्या कुंचल्यावरील हुकमतीचा अंदाज येतो.

 
art

चित्रकार मानसिंग काटकर यांची ‘रेड ट्री’ नावाची अमूर्त शैलीतील कलाकृती आकर्षक रंगलेपनाच्या न्यासामुळे लक्ष आकर्षून घेते. शिल्पकार नितीन मेस्त्री यांची ‘ब्रॉन्झ’ आणि ‘टीकवूड’ माध्यमातील कलाकृती ‘व्हू अ‍ॅम आय’ गंभीर आहे, स्तंभित करणारी आहे. शिल्पकार प्रदीप शिंदे याचा ‘स्क्रॅप’ धातू माध्यमातील ‘बिअर्ड मॅन’ लक्षवेधक आहे. अशा विविध माध्यमांनी युक्त अशा आशयपूर्ण कलाकृती या प्रदर्शनात मांडलेल्या आहेत.

प्रणिता बोरा, प्रदीप कांबळे, प्रशांत इप्ते, प्रतिभा वाघ, रामजी शर्मा, राहुल कांबळे, रघु नेवरे, रमेश थोरात, रणजित कुर्मी अशा प्रयोगशील कलाकारांच्या कलाकृती येथे पाहायला मिळतील. ज्येष्ठ शिल्पकार रतन साहा यांची ‘फायबर’ आणि ‘ब्रॉन्झ’ माध्यमातील त्रिमित कलाकृती कला रसिकांचं लक्ष वेधून न घेईल तरच नवल! रवींद्र पवार, रत्नदीप आडीवरेकर, सागर ब्रोंद्रे, सचिन चौधरी, संजय साबळे, शिल्पा निकम, शुभा गोखले, शिल्पा पाटोले, सिद्धार्थ आहे, सुधीर पवार अशाही ज्येष्ठ कलाकारांना त्यांच्या कलाकृतीद्वारे कला रसिकांना भेटता येणार आहे.

 
art

‘ललित कले’चे चेअरमन राहिलेले डॉ. उत्तम पाचरणे यांची ‘शिवपार्वती’नामक ‘ब्रॉन्झ’मधील त्रिमिताकृती, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांची ‘ऑईल’ रंगातील ‘डिव्हाईन थर्स्ट’ ही कलाकृती चित्राकर्षक आहे. प्रयोगशील चित्रकार विजय आचरेकर यांचे ‘अ‍ॅक्रॅलिक’ रंगातील व्यक्तिचित्रण सुंदर आहे. चित्रकार विजय राऊत यांच्या ‘मायाजाल’ या कलाकृतीनेही रसिकमनावर ‘मायाजाल’ अंथरले आहे. सर्वच कलाकारांच्या कलाकृतींमध्ये रसग्रहणात्मक क्षमता आहेत. सर्वांचीच माहिती येथे या लेखात देणे, हे या लेखाचे प्रयोजन नाही, तर या प्रदर्शनात काय काय पाहायला मिळेल, याची तोंडओळख करून देण्याचा प्रयत्न या लेखात केलेला आहे. ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’ची ही कलादालने पश्चिम द्रुतगतीच्या उपनगरीजवळ स्थित आहेत.

‘बांद्रा रेक्लमेशन’ हे उद्योग संकुल म्हणजे एक प्रचंड मोठे व्यावसासिक ‘हब सेंटर’ आहे. याच परिसरात, ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’ची कलादालने आहेत. दृश्यकलाकारांनी या दालनांना जवळ करायला हवं. मोठ्या म्हणण्यापेक्षा नामवंत गॅलरीत प्रदर्शन भरविणे आणि नामवंत कलाकृती, थोड्याशा दूर वाटणार्‍या गॅलरीत, परंतु कलाइतिहास लाभलेल्या नावाशी जोडल्या गेलेल्या ठिकाणी प्रदर्शित केल्या, तर त्या कलाकृतींबरोबरच त्या कलाकारालाही मोठा ‘एक्स्पोजर’ मिळू शकते.

 
art

या संस्थेत प्रत्यक्ष दृश्यकलाकृती निर्माण करणारे अनेक नामवंत कलाकार जोडलेले आहेत. त्यांचेही प्रोत्साहन या गॅलरीमध्ये प्रदर्शन भरविणार्‍या कलाकारास प्राप्त होऊ शकते. कलापर्यटन हा विषय खरंतर ‘आर्ट स्कूल’मध्ये ’आऊटडोअर’ विषयाशी जोडला जायला हवा. म्हणजे कलासंग्रहालये आणि कलादालने यांना भेट देण्याची सवय कलाशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना लागेल, जेणेकरून कलासंस्कृती पाहणे, त्यांचा अभ्यास करणे, निरीक्षणे नोंदविणे, अशा गृहपाठसदृश घटकांना महत्त्व प्राप्त होईल. कलाकार, कलाकृती आणि कलाक्षेत्राचं खुलं शेत म्हणजे ही कलादालने आहेत. या कलादालनांद्वारेच ओळख निर्माण होते. ’बॉम्बे आर्ट सोसायटी’चं कलायोगदान हे देशाच्या कलासंस्कृतीतील मैलाच्या दगडाप्रमाणे दिशादर्शक आहे. हा ‘मान्सून शो’ म्हणजे कलारसिक आणि कलाकारांसाठी कलायोग आहे. या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन सोसायटीतर्फे शिल्पकार विक्रांत मांजरेकरांनी केले आहे. या शोला दै. ‘मुंबई तरूण भारत’तर्फे शुभेच्छा…!

– प्रा. डॉ. गजानन शेपाळ

Source: https://www.mahamtb.com/Encyc/2022/7/30/article-on-Bombay-Art-Society-s-Monsoon-Show.html