मुंबई बातम्या

दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त; मुंबई महापालिकेची राज्य सरकारला ग्वाही – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाला वेग देण्यात आला असून, येत्या दोन वर्षांत सर्व कामे पूर्ण होऊन मुंबई खड्डेमुक्त होईल, अशी ग्वाही महापालिका प्रशासनाच्या वतीने आयुक्त इकबालसिंह चहल यांनी राज्य सरकारला दिली आहे. सध्या २३६ किमी अंतराच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून, ४०० किमीची कामे प्रस्तावित असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.

मुंबईतील रस्त्यांची कामे, तसेच पावसामुळे रस्त्यावर पडणारे खड्डे याबाबतच्या कार्यवाहीचा एकत्रित आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी घेतला. यावेळी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुंबईतील रस्ते सुधारणा उपाययोजनांबाबत आयुक्तांनी या बैठकीत सादरीकरण केले. मुंबईत टप्प्याटप्प्याने काँक्रीटीकरणाने रस्तेबांधणी केली जात आहे. पालिका क्षेत्रात आतापर्यंत सुमारे ९८९.८४ किमी लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्ते सुधारण्याच्या दृष्टीने काँक्रीटीकरणाला वेग देण्यात आला आहे. काँक्रीटीकरणामुळे रस्त्यांवर खड्डे पडण्याचे प्रमाण अत्यल्प असून, पर्यायाने देखभालीचा खर्च कमी होतो, अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे.

सन २०२२-२०२३ मध्ये २३६.५८ किमी लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण काम होत आहे. त्यासाठी दोन हजार २०० कोटी रुपयांचा खर्च होत आहे. तर आणखी तब्बल ४०० किमी लांबीच्या रस्त्यांचे काम याच वर्षी प्रस्तावित आहे. तर उर्वरित ४२३.५१ किमी लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण पुढच्या वर्षी हाती घेण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे. म्हणजेच पुढील दोन वर्षात मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त होतील, असा विश्वास या बैठकीत आयुक्तांनी व्यक्त केला.

…..

पाण्याच्या निचऱ्यासाठी शोष खड्डे

जोरदार पावसामुळे आणि विशेषतः सखल भागात पावसाचे पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेता वेगवेगळ्या उपाययोजना पालिकेतर्फे केल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून काँक्रीटीकरण करताना ठराविक अंतरावर शोष खड्डे तयार केले जाणार आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा सहजपणे होऊ शकेल आणि पुराचे पाणी रस्त्यावर येणार नाही. नवीन कामांच्या निविदांमध्ये या अटीचा समावेश करण्यात आला आहे.

…..

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

रस्त्यांवर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षामध्ये आणि प्रमुख अभियंता (रस्ते), उपप्रमुख अभियंता (रस्ते) यांच्या कार्यालयाला देखील जोडले जाणार आहेत. त्यामुळे प्रशासनाला या रस्त्यांवर थेट नजर ठेवता येईल.

……

पाच हजार कोटींची कामे प्रस्तावित

शहर विभाग : ५० किमी ८०० कोटी

पूर्व उपनगर : ७५ किमी ६०० कोटी

पश्चिम उपनगर : २७५ किमी ३ हजार ५०० कोटी

एकूण : ४ हजार ९०० कोटी

यामध्ये १३.४० मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण पॅसेजमध्ये (२०० मिमी जाड काँक्रीट थराचा रस्ता) करण्यात येतील. तर १३.४० मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांची सुधारणा (२८० मिमी जाड काँक्रीट थर) काँक्रीटीकरणामध्ये करण्यात येईल.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bombay-municipal-corporation-assures-the-state-government-that-mumbai-will-be-pothole-free-in-two-years/articleshow/93082243.cms