मुंबई बातम्या

Amit Thackeray : मुंबई ते अंबरनाथ….’राज’पुत्राचा लोकलने प्रवास; VIDEO व्हायरल – Maharashtra Times

अंबरनाथ : मनसेची पक्षसंघटना बळकट करण्यासाठी आणि अधिकाधिक तरुणांना पक्षासोबत जोडण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे सध्या राज्यातील विविध भागांचा दौरा करत आहेत. अमित ठाकरे हे आज अंबरनाथ दौऱ्यावर असून यावेळी ते मनसे पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. या दौऱ्यासाठी अमित ठाकरे यांनी दादर ते अंबरनाथ असा लोकलने प्रवास केला.

अमित ठाकरे यांचा आज अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर येथे संवाद दौरा आहे. या दौऱ्यात ते विद्यार्थी, युवक-युवतींसोबत संवाद साधणार आहेत. तसंच अमित यांच्या या दौऱ्यावेळी अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी मनसेत प्रवेश करणार आहेत. या दौऱ्यासाठी मुंबईतून निघाल्यानंतर अमित ठाकरे यांनी लोकलने अंबरनाथ गाठलं. लोकल हा खरंतर मुंबई आणि आसपासच्या शहरातील नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण लोकलच्या साहाय्याने चाकरमान्यांना आपल्या इच्छित स्थळी वेळेत पोहोचता येतं. याच मुंबई लोकलमधून अमित ठाकरे यांनी केलेला प्रवास आता चर्चेचा विषय ठरला आहे.

अमित ठाकरे यांचा असा आहे दौरा

– सकाळी ९ वाजता प्राचीन शिवमंदिर, अंबरनाथ येथे अभिषेक

– सकाळी १० वाजता रोटरी क्लब अंबरनाथ पूर्व येथे तरुणांशी संवाद आणि पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा

– दुपारी १२ वाजता बदलापूर घोरपडे चौक येथे आगमन (जेवणासाठी राखीव)

– दुपारी १ वाजता घोरपडे हॉल येथे तरुणांशी संवाद

– संध्याकाळी ५ वाजता उल्हासनगर जवाहर हॉटेलजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेला भेट

– टाऊन हॉल येथे तरुणांशी संवाद

– संध्याकाळी विठ्ठलवाडी स्टेशनहून लोकलने मुंबईकडे रवाना

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/thane/mns-president-raj-thackerays-son-amit-thackeray-traveled-from-mumbai-to-ambernath-by-local-video-viral/articleshow/93045588.cms