मुंबई बातम्या

मुंबई : डी कंपनीच्या नावे धमकी देणाऱ्यास अटक – Loksatta

‘डी कंपनीमधून शकील भाईचा माणूस बिल्लो बोलतोय, मला ३५ लाख रुपये दे नाहीतर उडवून टाकू’, असा धमकीचा फोन अंधेरी पूर्वेकडील एका व्यक्तीला परराज्यातील मोबाइल क्रमांकावरून येत होते. यासंदर्भात पोलिसांनी ओशिवरा परिसरातून एका आरोपीला मंगळवारी अटक केली असून न्यायालयाने २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अंधेरी पूर्वेकडील एका व्यक्तीला ९ जुलैपासून आरोपीकडून परराज्यातील मोबाइल क्रमांकावरून फोन येत होते. यावेळी ३५ लाख रुपयांची खंडणीची मागणी आरोपीने केली. अन्यथा जीवे मारण्याची धमकी तक्रारदाराला दिली होती. यासंदर्भात मोबाइलवरून धमकवणाऱ्या बिल्लो विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर १३ ते १९ जुलैपर्यंत विविध परराज्यातील मोबाईल क्रमांकाचा वापर करून या व्यक्तीला आरोपीकडून धमकावले जात होते. खंडणी विरोधी कक्ष, गुन्हे शाखा पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घेतला. त्यानंतर १९ जुलै रोजी ओशिवरा येथे सापळा रचून आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून दोन मोबाइल आणि दोन सिमकार्ड ताब्यात घेतली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Source: https://www.loksatta.com/mumbai/arrested-for-making-threats-against-d-company-mumbai-print-news-amy-95-3031338/