छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील पुलावरून जाताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. या पुलावर दुचाकी चालविण्यास मनाई आहे. असे असतानाही पुलावरून दुचाकी चालविणाऱ्या मृत महिलेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन पाटील आणि अंकिता पाटील दाम्पत्य कुटुंबियांसमवेत आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ वास्तव्याला आहेत. नितीन मर्चंट नेव्हीमध्ये कामाला आहेत. नितीन आणि अंकिता १० जुलै रोजी दुपारी दुचाकीवरून नवी मुंबईला जात होते. विमानतळापासून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीतून जाण्याऐवजी त्यांनी सदर पुलावरून जाणे पसंत केले. या पुलावर दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना प्रवेश बंदी आहे. असे असतानाही ते दुचाकीवरून या पुलावर गेले. तेथील सुरक्षा रक्षकांनी त्यांना थाबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी दुचाकी थांबविली नाही. पुलावरून जात असताना धातूच्या पट्टीवरून दुचाकी घसरली आणि अंकिताच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तत्काळ त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असताना अंकिताचा १४ जुलै रोजी मृत्यू झाला.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी नितीन विरोधात निष्काळजीपणे गोडी चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पूल जोडणीसाठी वापरलेल्या धातूच्या पट्ट्या पावसामुळे निसरड्या झाल्या होत्या, तायमुळे पुलावरून जाणाऱ्या अनेक दुचाकी घसरल्याचे पोलिसांनी सांगितले.
Source: https://www.loksatta.com/mumbai/mumbai-bike-accident-on-closed-bridge-death-of-a-woman-mumbai-print-news-msr-87-3027038/