मुंबई बातम्या

Maharashtra Rains: मुंबई-पालघर ते पुणे-साताऱ्यात मुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट जारी – Maharashtra Times

मुंबई: राज्यात पावसाची धुवांधार बॅटिंग सुरु आहे. मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस कोसळतोय. अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती उद्भवली आहे. तर, हवामान विभागाने पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती असून यामुळे आतापर्यंत ९९ जणांचा मृत्यू झाला आहे. १८१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर ७,९६३ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे. राज्यात पावसामुळे एकूण १४ एनडीआरएफ टीम आणि ६ एसडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ४५-५५ किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे ६५ किमी प्रतितास वाहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-विंग कमांडर मराठे कुटुंबासह पाण्यात अडकले, हॅरिस पुलाखालून सुटका करण्यात यश

पंचगंगेच्या पाणीपातळीत संथ गतीने वाढ; जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली

कोल्हापुरातील पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू आहे. पंचगंगा सध्या ३७ फूट ८ इंचावरून वाहत असून पंचगंगेची इशारा पातळी ३९ फूट आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक पुलांवर आणि रस्त्यांवर पाणी आल्याने प्रशासनाकडून काही रस्ते बंद करण्यात आले आहेत.

नागपुरात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता

नागपूरमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर येथे काही ठिकाणी, अमरावती, वर्धा, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-डोळ्यात पाणी आणणारी दृश्य! जुन्नर तालुक्यात भूस्खलन, ३० एकर शेती जमिनीत गाडली गेली

पर्यटनस्थळी कलम १४४ लागू

हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच अपघाताचा संभाव्य धोका लक्षात घेता फौजदारी दंड संहितेच्या कलम १४४ नुसार जिल्ह्यातील गडकिल्ले, धरण, तलाव , धबधबे आदी पर्यटनस्थळ परिसरात जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी १७ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

हवेली तालुक्यातील सिंहगड किल्ला, आतकरवाडी ते सिंहगड ट्रेक, मावळ तालुक्यातील किल्ले लोहगड, किल्ले विसापूर, किल्ले तिकोणा, किल्ले तुंग, ड्युक्स नोज, भाजे लेणी, भाजे धबधबा, दुधीवरे खिंड, पवना परिसर, राजमाची ट्रेक, किल्ले कातळदरा धबधबा, कोंढेश्वर ते ढाकबेहरी किल्ला, एकविरा लेणी परिसर, मुळशी तालुक्यातील अंधारबन ट्रेक, प्लस व्हॅली, कुंडलिका व्हॅली, दिपदरा, कोराईगड, भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ला, वेल्हा तालुक्यातील किल्ले राजगड, किल्ले तोरणा, पाणशेत धरण परिसर, मढेघाट, जुन्नर तालक्यातील किल्ले जीवधन, आंबेगाव तालुक्यातील बलीवरे ते पदरवाडी, भिमाशंकर ट्रेक (बैलघाट, शिडीघाट, गणवतीमार्गे) या ठिकाणी असलेले किल्ले, धबधबे, तलाव किंवा धरण या ठिकाणांच्या सभोवताली एक किलोमीटर परिसरात १७ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत.

हेही वाचा – Nagpur Rain: पावसाने झोडपलं, घरादारात पाणी, नागपूरकरांची अवस्था दाखवणारे Photo

पुणे, नवी मुंबई, ठाणे, पालघरमध्ये शाळांना सुट्टी

पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर आणि पुरंदर हे तालुके वगळता इतर सर्व तालुक्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना १४ जुलै ते १६ जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. तसेच, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह पालघर, पनवेल महापालिका हद्दीतील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या, माध्यमिक आणि प्राथमिक शाळांना गुरुवार, १४ जुलै रोजी शिक्षण विभागाच्या वतीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-rain-update-news-monsoon-2022-red-alert-for-palghar-and-yellow-alert-issued-in-mumbai-thane-raigad-ratnagiri/articleshow/92890531.cms