मुंबई बातम्या

Mumbai University Exams : मुंबई विद्यापीठाच्या गुरुवारी होणाऱ्या परीक्षा रद्द – Loksatta

मुंबई विद्यापीठाच्या क्षेत्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये गुरुवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे गुरुवारी होणाऱ्या सर्व परीक्षा विद्यापीठाने रद्द केल्या आहेत. मागील काही दिवसांपासून मुंबई तसेच उपनगरात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे येथे बस तसेच रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली आहे. याच कारणामळुळे खबरदारी म्हणून विद्यापीठ प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठाच्या क्षेत्रात मुंबईसह, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हे येतात. या सर्व ठिकाणी पावसाची संततधार आहे. त्याचप्रमाणे गुरुवारीही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने उद्या गुरुवारी (१४ जुलै) होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षांची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. उद्या मुख्यतः अभियांत्रिकी विद्याशाखेच्या परीक्षा आहेत. त्याचबरोबर इतरही विद्याशाखांच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.

Source: https://www.loksatta.com/mumbai/mumbai-university-cancel-exams-to-be-held-on-thursday-because-of-rain-prd-96-3019955/