मुंबई बातम्या

मुंबई-गोवा महामार्गः आणखी किती बळी गेल्यावर जाग येणार? – Maharashtra Times

मुंबई-गोवा महामार्गाचे दुष्टचक्र संपवण्यासाठी झगडत असलेल्यांसह वाचकही कोकणवासीयांच्या या गैरसोयीविषयी लिहिते झाले. यातील निवडक प्रतिक्रिया.

आर्थिक नुकसान आणि जीवाला धोका

सन २०११मध्ये मी नवीन गाडी घेतली. त्यावेळी होणारे रस्त्याचे काम पाहून वाटले की, पुढच्या वर्षी हा रस्ता गणपतीपर्यंत पूर्ण होईल आणि ठाण्यावरून सहा तासांत मी गावी पोहोचेन. मधल्या काळात युती-आघाड्या आल्या नि गेल्या. केंद्राने राज्याकडे आणि राज्याने केंद्राकडे बोट दाखवून जनतेस फसवले. गेल्या वर्षी सिंधुदुर्ग पट्ट्यातील महामार्ग बऱ्यापैकी पूर्ण झाला, पण गेल्या वर्षभरात पळस्पे ते इंदापूर पट्ट्यात माझे वेगवेगळ्या प्रवासात दोन चांगले टायर गेल्यावर मी आता टोल भरून कोल्हापूर रस्त्यानेच जातो. त्या अगोदर माझ्या भावाच्या कारचे लांजाजवळ एका बाजूने इंजिन निखळले. वेळीच लक्षात आले नसते तर मोठा अपघात झाला असता. या निसर्गरम्य महामार्गावर लोकांना सांगायला फक्त जीवघेणे अनुभवच आहेत. सरकारला अजून किती बळी गेल्यावर जाग येणार आहे?

– विश्वनाथ मनोहर सावंत, ठाणे

लोकप्रतिनिधींनी आधीच लक्ष द्यायला हवे होते

रस्ते नियोजनात राहिलेल्या त्रुटींसाठी इंजिनीअर्स जबाबदार आहेत. तसेच हे काम सुरू असताना लोकप्रतिनिधींनीही दक्ष राहण्याची गरज होती. पण या सगळ्यांनीच आपल्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. त्याचे परिणाम आज सामान्य लोक भोगत आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने या सगळ्याला वाचा फोडल्यानंतर तरी यंत्रणांना जाग येईल अशी अपेक्षा आहे.

– डॉ. सुमेधा नाईक, मालवण

..

सुरक्षितता महत्त्वाची

मी एक सनदी अभियंता आहे व सुरक्षितता या विषयात गांभीर्याने लक्ष देणारा आहे. मला असे खेदाने म्हणावेसे वाटते की, कोणत्याही क्षेत्रात सुरक्षितता ही आता फक्त कागदावरच उरली आहे. रस्ते सुरक्षिततेबाबत तर काही विचारायला नको. रस्ते काँक्रिटीकरणाचे काम जिथे चालू आहे तिथे अडथळ्याच्या ठिकाणी परावर्तीत होणारे साइन बोर्ड्स का लावले जात नाहीत? सरकार म्हणेल ठेकेदाराच्या कक्षेत आहे. ठेकेदार म्हणेल आम्ही लावतो, चोरी होतात. सध्या फक्त जबाबदाऱ्या टाळणाऱ्यांचे दिवस आहेत. कुटुंबामधील सदस्य मृत्युमुखी पडतो तरी कोणालाही त्याचे काही सोयरसूतक नाही का? तळपायाची आग मस्तकात जाण्यासारख्या या घटना आहेत आणि कोणीही गांभीर्याने पाहायला तयार नाही. मंत्री आणि ठेकेदार यांनी या आणि अशा रस्त्यावरून रात्री प्रवास केल्याशिवाय त्यांना वास्तवतेची कल्पना येणार नाही.

– श्रीकांत साठे

..

देवाक काळजी

मी कोकणातला. देवली (मालवण) हे माझे गाव. तीन वर्षांपूर्वी मी मुंबई-गोवा महामार्गाने गेलो होतो. अनुभव एवढा वाईट की, खड्ड्यांमुळे गाडीतील रेडिओची गाणी बदली होत होती. गाडीच्या पत्र्याच्या कामाचा खर्च करावा लागला. नंतर मी कोल्हापूर मार्ग निवडला . या मे महिन्यात मुंबई-गोवा महामार्गाने गेलो. परशुराम घाट कामासाठी बंद होणार म्हणून सकाळी लवकरच निघालो. काही ठिकाणी रस्ता चांगला, पण काही ठिकाणी रस्ता एवढा खराब आहे की गाडी चालवणे कठीण आहे. आपल्या वृत्तमालिकेतील उल्लेख एकदम बरोबर आहे. ठराविक ठिकाणी का काम रखडले, असे लेख वर्तमानपत्रांमध्ये आले तर फरक पडेल हीच वेडी आशा. एक कोकणी माणूस म्हणून ‘मटा’चे मनापासून आभार. वेळेतच रस्ता पूर्ण होवो हेच सर्व देवांना गाऱ्हाणे. बाकी देवाक काळजी.

– रविंद्र आवले, मुंबई

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/financial-loss-and-danger-to-life-on-mumbai-goa-highway/articleshow/92815242.cms