मुंबई बातम्या

मुंबई-गोवा महामार्ग रखडलेलाच; कोकणवासीयांच्या सहनशक्तीचा किती अंत पाहणार? – Maharashtra Times

कोकण मालिका वाचक प्रतिक्रिया

१२ वर्षांहून अधिक काळ दुरवस्थेच्या गर्तेत अडकलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची व्यथा महामार्गाचा वनवास या मालिकेतून सर्वांसमोर आली. या मालिकेतील प्रत्येक भागानंतर वाचकांच्या प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पडला. या महामार्गाचे दुष्टचक्र संपवण्यासाठी झगडत असलेल्यांसह वाचकही कोकणवासीयांच्या या गैरसोयीविषयी लिहिते झाले. यातील निवडक प्रतिक्रिया.

अजून किती हाल सोसायचे?

महाराष्ट्र टाइम्समधील ‘आम्हीही भोगतोय…’ यातील सर्व लोकप्रतिनिधींची मते वाचून सखेद आश्चर्य वाटले. एवढे सत्ताधारी किंवा विरोधात असलेल्या आमदारांवर अशी नामुष्कीची वेळ येईल हे माहीत नव्हते. मी लहानपणापासून या मार्गानेच मालवणात जात होतो. रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर कोल्हापूरमार्गे जायला लागलो. गेली कित्येक वर्षे हा रस्ता पूर्ण होण्याची वाट पहात आहे. गेल्या अनेक वर्षांतील केंद्र व राज्य दोन्ही सरकारे गांभीर्यपूर्वक या रस्त्याच्या कामात लक्ष घालत नसल्याने, तसेच दंडात्मक कठोर कारवाई करण्यात येत नसल्यानेच आम्हां कोकणवासीयांचे हाल होत आहेत. ‘समृद्धी महामार्ग’ एवढ्या कमी वेळात होऊ शकतो तर आमचा का नाही होत….? कोकणवासीयांचा प्रभावी दबावगट नाही, अत्यंत महत्त्वपूर्ण कामांच्या पूर्ततेसाठी राजकीय पक्षकल सोडून शासन यंत्रणेवर एकवटून दबाव निर्माण करण्यात कोकणी माणसे कमीच पडतात असे दिसते. कोल्हापूरचे नागरिक जसे जनहितार्थ एकवटून आवाज उठवतात तसे कोकणात झाले तर फार वेगळे चित्र दिसून येईल. इतकी वर्षे हे काम पूर्ण न होणे ही कोकणातील लोकप्रतिनिधींच्या तसेच कोकणवासीयांच्या दृष्टीने खेदजनकच बाब. बरीच वर्षे कळ सोसत आपल्या वाहनांची व शरीराची नासधूस करत कोकणी नागरिकांनी प्रवास केलाय, तसेच कोल्हापूर मार्गे प्रवास करून नाहक टोलचा भुर्दंड भरावा लागलेला असल्याने, सरकारने या रस्त्यावर टोल नाके उभारता कामा नयेत, असेच माझे ठाम मत आहे. माझ्या मताशी समस्त कोकणवासीय सहमत असतील अशी खात्री आहे.

– जयेंद्र जयंत साळगांवकर, मुंबई

कंत्राटदार, लोकप्रतिनिधींची युती जबाबदार

काही लोकप्रतिनिधींचा अपवाद वगळता कोकणातील सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांची मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबतची भूमिका पारदर्शी नाही. मुख्य ठेकेदार, पोटठेकेदार आणि पुरवठादार हे या राजकीय पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते आहेत. या सगळ्यांचे ठेकेदार कंपनीसह आर्थिक हितसंबंध असल्याने ठेकेदार कंपनीविरोधात असे नेते भूमिका घेत नाहीत आणि त्यामुळे ठेकेदारांचे फावते ही वस्तुस्थिती नाकारून कसे चालेल? या हितसंबंधामुळे महामार्गाच्या कामाचा दर्जाही राखला जात नाही ठेकेदार आणि राजकारणी यांची ही युती काही अंशी महामार्गाचे काम राखडण्याला कारणीभूत ठरत आहे मुळात पावसामुळे कोकणातील डांबरी रस्ते टिकत नाहीत असे म्हणणे ही लोकांची दिशाभूल आहे. डांबरी रस्ते कसे असावेत याचे अलीकडील उदाहरण म्हणजे १९९८मध्ये झालेला चिपळूण ते अंजनवेल हा एन्रॉन प्रकल्पाचा रस्ता. २४ वर्षे होवूनही हा रस्ता उत्तम आहे. या रस्त्यावर आजही एक खड्डा नाही. या भागात पाऊस पडत नाही असे मानायचे का?

– संजीव आणेराव, पर्यावरणतज्ज्ञ, चिपळूण

आमचेच दुर्दैव

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडण्याची कोकणातील लोकप्रतिनिधींनी दिलेली कारणे आपण १० जुलै रोजी छापली आहेत. ज्यामध्ये आमच्या लोकप्रतिनिधींनी त्यांची हतबलता मान्य केली आहे. मात्र सोबत नेहमीप्रमाणे एकमेकांवरही दोषारोप केले आहेतच. परंतु (हे लोकप्रतिनिधी जसे सत्तेसाठी एकत्र येऊन बंड करतात तसे) जर एकत्रितपणे आवाज उचलला असता तर आज ही हतबलता कबूल करण्याची वेळ आली नसती. असे लोकप्रतिनिधी आम्ही निवडून दिले आहेत हे आमचे दुर्दैव आहे अशीच कोकणवासीयांची भावना आजतरी असावी.

– संतोष ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते, पळस्पे-इंदापूर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पग्रस्त कृती समिती

मागण्या गांभीर्याने घ्या

मुंबई-गोवा महामार्गाची व्यथा सर्वांसमोर आणल्याबद्दल महराष्ट्र टाइम्सचे आभार, आता नवे सरकार याची गंभीर दखल घेईल अशी अपेक्षा आहे. कोकण महामार्ग समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही काही मागण्या सातत्याने करत आहोत. महामार्गावर अनेक मोठी गावे दुभागली आहेत, या गावांमध्ये गावकरी, शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी अंडरपास व्यवस्था तसेच, महामार्गावर प्रमुख शहरे व गावांच्या इथे सर्व्हीस सर्व्हिस रोड आवश्यक आहे. जेएनपीटी आणि दिघी ही दोन बंदरे असल्यामुळे या ठिकाणी आताच मोठ्या प्रमाणात कंटेनर आणि मालवाहतूक आहे. या मोठ्या गाड्यांमुळे मोठे अपघात होतात. म्हणूनच पनवेल ते माणगाव येथे आठपदरी रस्ता व यातील चार लेन स्वतंत्र कंटेनर आणि अवजड वाहतुकीकरिता हव्यात. या हायवेवर प्रचंड भरव टाकल्यामुळे दोन्ही बाजूंना प्रचंड प्रमाणात पाणी साठते त्यामुळे शेतीच्या जमिनीची नासधूस होत आहे. गावांमध्ये कधी नव्हे इतके पूर येत आहेत. याचा अभ्यास करून पाणी पलीकडे जाण्यासाठी पुरेशी व्यवस्था करणे आवश्यक आहे. सर्वाधिक जैवविविधता असलेला ग्रीन हायवे म्हणून याची जगात ओळख निर्माण केली पाहिजे. कोकणच्या भौगोलिक रचनेचा विचार न करताच हा महामार्ग उभारला जात आहे. त्यामुळेच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. निदान नवीन सरकार हा महामार्ग दर्जेदार आणि अधिक सुरक्षित करेल ही अपेक्षा.

– संजय यादवराव, अध्यक्ष, कोकण हायवे समन्वय समिती, मुंबई

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/when-mumbai-goa-four-laning-to-be-completed/articleshow/92792526.cms