मुंबई बातम्या

गणेशोत्सवासाठी परवानगी आजपासून ; मंडळांचे अर्ज स्वीकारण्यासाठी मुंबई पालिकेची ‘एक खिडकी’ – Loksatta

मुंबई : करोना संसर्ग कमी होत असल्याने मुंबई पालिका प्रशासनाने सार्वजनिक मंडळांना गणेशोत्सवासाठी परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू केली असून सोमवार, ४ जुलैपासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या परवानग्यांसाठी ‘एक खिडकी’ कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. गणेशमंडळांना यंदा परवानगी शुल्क यंदा भरावे लागणार आहे.

गेली दोन वर्षे गणेशोत्सवावर करोना व टाळेबंदीचे सावट होते. त्यामुळे मूर्तीची उंची, मिरवणुकीतील कार्यकर्त्यांची संख्या असे निर्बंध होते. यंदा मात्र हे संकट बिकट नसल्यामुळे सार्वजनिक मंडळे पूर्वीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करणार आहेत. यासाठी त्यांनी पालिका प्रशासनाकडे परवानगी देण्याची मागणी केली होती.

यंदा ३१ ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने सार्वजनिक मंडळांना परवानगी देण्यासाठीची प्रक्रिया आतापासून सुरू केली आहे. यासाठी करोनापूर्व काळाप्रमाणेच एक खिडकी कार्यपद्धती सुरू करण्यात आली आहे. वाहतूक पोलीस, मुंबई अग्निशमन दल व विभागातील पोलीस ठाण्याचे ना हरकत प्रमाणपत्र यामुळे एकाच ठिकाणी मिळणार आहे.

 सोमवार ४ जुलैपासून एक खिडकी योजना सुरू होणार असून २३ ऑगस्टपर्यंत परवानगीसाठी अर्ज करता येईल.  मात्र टाळेबंदीमुळे गेली दोन वर्षे न आकारलेले  १०० रुपये परवानगी शुल्क यंदा आकारले जाणार आहे. तसेच गणेश मंडळांना ऑनलाईन पद्धतीने हमीपत्र  सादर करणे बंधनकारक आहे. ज्या गणेश मंडळांना गेल्या वर्षी परवानगी दिली असेल त्या मंडळांनी पालिकेकडे अर्ज पाठवावा, त्यांना त्वरित परवानगी देण्यात येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र त्यासाठी गेल्या वर्षी दिलेल्या परवानगीचा क्रमांक अर्जात नमूद करणे आवश्यक आहे. 

मुंबईत १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. मात्र  रस्त्यावर मंडप घालून उत्सव साजरा करतात, मंडळांना दरवर्षी  वाहतूक पोलीस, मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस ठाण्यांची रितसर परवानगी घेणे बंधनकारक असते. करोनामुळे गेल्या दोन वर्षांत अनेक मंडळांनी गणेशोत्सव रद्द केला होता, तर काहींनी दीड दिवसांतच गणेशमुर्तीचे विसर्जन केले होते. यंदा मात्र मोठय़ा संख्येने  मंडळे गणेशोत्सव साजरा करतील, अशी शक्यता आहे.

समितीबरोबर बैठक..

शाडूच्या गणेशमूर्तीसाठी पालिकेने भाविकांना आवाहन केले आहे. घरगुती गणेशमूर्ती दोन फुटांची असावी, सार्वजनिक मंडळांनाही मुर्तीची उंची कमी असावी, असे आवाहन केले आहे. ‘पीओपी’च्या मूर्तीचे विसर्जन नैसर्गिक जलाशयांमध्ये विसर्जन करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र याबाबत सार्वजनिक मंडळांच्या काही मागण्या आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी सोमवारी पालिका प्रशासन, गणेशोत्सव समितीसोबत बैठक घेणार आहे.

Source: https://www.loksatta.com/mumbai/mumbai-municipal-corporation-started-giving-permission-to-ganeshotsav-mandal-zws-70-3003204/