मुंबई बातम्या

भाईंचं बंड, शिवसैनिक पेटले, मुंबईत तणाव, पुढचे १५ दिवस जमावबंदी लागू, मुंबई पोलिसांचा निर्णय! – Maharashtra Times

मुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसैनिक कमालीचे आक्रमक झाले आहेत. बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर आणि घरांवर शिवसैनिक धडत देत आहेत, कार्यालये फोडत आहेत, त्यांच्या फ्लेक्सला काळं फासत आहेत. अशा सगळ्या परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतलाय. आजपासून पुढील १५ दिवस म्हणजेच १० जुलैपर्यंत मुंबईत कलम १४४ लागू करण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. कोणत्याही पक्षाने किंवा पक्षाच्या कार्यकर्त्याने कायदा हातात घेऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांनी जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जमावबंदी लागू केल्यानंतर चार किंवा चारपेक्षा अधिक लोकांना एकत्र जमता येणार नाही.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसैनिक पेटून उठले आहेत. राज्यातील विविध शहरात बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक निदर्शने करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात विशेषत: मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी काल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर आज मुंबई पोलीस आयुक्तांनी मुंबई पोलिस दलातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेविषयी चर्चा केली. त्यानंतर मुंबईत जमाव बंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडाने शिवसैनिक आक्रमक, मुंबईत जमावबंदी

  • मुंबईत १० जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश
  • मुंबईतील सर्वच राजकीय पक्षांचे कार्यालये, मंत्री, खासदार आमदार, नगरसेवकांच्या कार्यालयाबाहेर बंदोबस्ताच्या सूचना
  • स्थानिक राजकीय व्यक्तींसोबत समन्वय ठेवून अधिक माहिती काढण्याच्या पोलिसांना सूचना
  • सध्या सुरु असलेले राजकीय कार्यक्रम, बैठका याठिकाणी योग्य बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना
  • सोशल मीडियावर लक्ष ठेऊन भडकावू पोस्टवर कारवाई करण्याचे आदेश
  • स्थानिक ठिकाणी संभाव्य राजकीय हालचालीबाबत माहिती घेऊन कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात कारवाई करा
  • कोणताही राजकीय पक्ष कायदा हातात घेणार नाही, तोडफोड करणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश, त्यापद्धतीने बंदोबस्त लावण्याचे आदेश
  • कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्टर, बॅनर्स लागणार नाही याची दक्षता घ्या

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-police-imposes-section-144-crpc-in-mumbai-city-over-eknath-shinde-rebel-stand-against-shivsena/articleshow/92453663.cms