मुंबई बातम्या

मुंबई : करोनाबाधितांमध्ये पोटाच्या विकारांच्या तक्रारी ; रुग्ण पाच ते सात दिवसांमध्ये पूर्णपणे बरे – Loksatta

करोनाबाधित रुग्णांमध्ये ताप, खोकल्यासह प्रामुख्याने पोटाचे विकार आढळत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे. ओमायक्रॉनच्या तिसऱ्या लाटेप्रमाणे याही वेळेस बहुतांश रुग्णांमध्ये घशाला वरच्या बाजूलाच संसर्गाची बाधा होत असून रुग्ण पाच ते सात दिवसांमध्ये पूर्णपणे बरे होत असल्यामुळे चिंतेचे कारण नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. सध्या मुंबईसह राज्यभरात ओमयक्रॉनचा उपप्रकार बीए.२ आणि बीए.२.३८ याने बाधा झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. जूनपासून बीए.४ आणि बीए. ५ या उपप्रकारांचा संसर्गाचे प्रमाणही वाढत आहे. ओमायक्रॉनचे हे उपप्रकार तुलनेने सौम्य असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये सुका खोकला, ताप यासह पोटाचे विकारही झाल्याचे आढळत आहे.

दुसऱ्या किंवा तिसऱ्या लाटेमध्ये करोनाबाधित रुग्णांमध्ये पोटाच्या विकारांचे प्रमाण तुलनेने कमी होते. आता काही रुग्णांमध्ये लक्षणांची सुरुवातच अतिसाराने होत असल्याचे दिसून आले आहे, असे सेव्हन हिल्स रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी सांगितले. करोनाबाधित रुग्ण आणि अन्य विषाणूजन्य आजार या सारखेपणा असला तरी करोनाबाधित रुग्णांमध्ये ताप हा तीव्र स्वरुपाचा असून याचा प्रभाव तीन दिवसांहूनही अधिक काळ असल्याचे आढळले आहे. दुसरे महत्त्वाचे लक्षण म्हणजे अतिसार, पोटदुखी रुग्णांमध्ये दिसून येत असल्याचे फॅमिली फिजिशियन डॉ. संजीवनी राजवाडे यांनी सांगितले.

रुग्णांमध्ये संभ्रम

पावसाळा सुरू झाल्याने पोटाचे विकार झाले असतील असा समज करुन अनेकदा रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आढळले आहे. अतिसार किंवा अन्य पोटाच्या विकारांची तीव्रता वाढल्यास दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत, असे डॉ. अडसूळ यांनी सांगितले आहे.

सुमारे ९० टक्के रुग्ण पाच ते सात दिवसांत बरे

रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांपैकी सुमारे ९० टक्के रुग्ण हे पाच ते सात दिवसांत बरे होऊन घरी जात आहेत. रुग्णांची लक्षणे ही साधारण चौथ्या दिवसापासून कमी होतात. ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, क्षयरोग असे दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांमध्ये आजाराची तीव्रता काही प्रमाणात जास्त असल्याचे आढळते. बहुतांश रुग्णांमध्ये घशाच्या वरच्या बाजूलाच संसर्ग होत आहे. फुप्फुसांपर्यंत संसर्ग जाण्याचे प्रमाण १० टक्के आहे. ज्या रुग्णांना दमा किंवा अस्थमा अन्य श्वसनाचे आजार आहेत, अशा रुग्णांमध्ये करोना संसर्गाचा परिणाम फुप्फुसांपर्यंत झाल्याचे आढळते, असे अडसूळ यांनी सांगितले.

Source: https://www.loksatta.com/mumbai/complaints-stomach-disorders-corona-heart-disease-patient-recovers-completely-mumbai-print-news-amy-95-2987057/