मुंबई बातम्या

मुंबई : समाजमाध्यमावरील आकर्षक प्रतिमा वास्तवदर्शी असतातच असे नाही उच्च न्यायालयाचे निरीक्षण – Loksatta

मुलीच्या देखभाल खर्चात कपातीची मागणी फेटाळली

समाजमाध्यमावर आकर्षक प्रतिमा तयार करणे ही आजकालच्या तरुणांची सवय बनली आहे. परंतु ही प्रतिमा वास्तवदर्शी असेलच असे नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. मुलीने समाजमाध्यमावर प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांचा आधार घेऊन ती मॉडेल असल्याचा आणि दरमहा ७० लाख रुपये कमवत असल्याचा दावा करून तिच्या देखभाल खर्चात कपातीची मागणी करणाऱ्याची याचिका फेटाळताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. मुलीला २५ हजार रुपये भरपाईचे आदेश देणाऱ्या कुटुंब न्यायालयाच्या आदेशाला अनिल मिस्त्री यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तसेच ही रक्कम कमी करण्याची मागणी केली होती. आपली मुलगी मॉडेल असून तिच्या समाजमाध्यम खात्यावरील वैयक्तिक माहितीवरून ती पुरेसे पैसे कमवत असल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला होता.

मात्र मुलीच्या समाजमाध्यम खात्यावरील तिची छायाचित्रे आणि तिची त्यावरील वैयक्तिक माहिती हे तिचे स्वतंत्र आणि पुरेसे उत्पन्न मानण्यासाठी पुरेसे नाही. किंबहुना समाजमाध्यमावर आकर्षक प्रतिमा तयार करणे ही आजकालच्या तरुणांची सवय बनली आहे. परंतु ही प्रतिमा वास्तवदर्शी असेलच असे नाही, असे न्यायमूर्ती डांगरे यांनी नमूद केले. तसेच याचिकाकर्त्याची मुलीच्यादेखभाल खर्चात कपात करण्याची मागणी फेटाळली.

प्रकरण काय ?

याचिकाकर्ता आणि त्याची पत्नी विभक्त झाल्यानंतर, पत्नीने स्वतःच्या आणि त्यांच्या दोन मुलांच्या देखभाल खर्चासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती. मात्र आपली मुलगी सज्ञान आहे आणि ती स्वत: नोकरी करत असून चांगले पैसे कमवते. त्यामुळे तिला देखभाल खर्च देण्याची आवश्यकता नाही, असा दावा याचिकाकर्त्याने केला होता

Source: https://www.loksatta.com/mumbai/social-media-realistic-observes-high-court-demand-reduction-girl-maintenance-costs-rejected-mumbai-print-news-amy-95-2985112/