मुंबई बातम्या

रक्तदानात महाराष्ट्र देशात अव्वल तर महाराष्ट्रात मुंबई सर्वप्रथम – Loksatta

-संदीप आचार्य

मुंबई स्वैच्छिक रक्तदानाच्या क्षेत्रात महाराष्ट्र जवळपास दशकभराहून अधिककाळ अव्वल राहिला आहे, तर महाराष्ट्रात मुंबई अग्रेसर ठरली आहे. करोनाच्या मागील दोन वर्षात म्हणजे २०२०-२१ मध्ये महाराष्ट्राने ३१ लाखाहून अधिक रक्ताच्या पिशव्यांचे संकलन केले असून एकूण एकूण जमा झालेल्या रक्तापैकी ९९ टक्के रक्तदान हे स्वैच्छिक रक्तदानाद्वारे जमा झाले आहे. महाराष्ट्रापाठोपाठ पश्चिम बंगाल दुसऱ्या स्थानावर तर तिसऱ्या स्थानावर गुजरातचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात करोनाकाळात मुंबईने सर्वाधिक रक्तदान शिबीरांचे आयोजन करून सर्वाधिक रक्तसंकलन केले आहे.

रक्तदानाच्या क्षेत्रात गेल्या दशकाहून अधिक काळ महाराष्ट्राने बजावलेल्या उत्तुंग कामगिरीच्या आसपासही देशातील एकही राज्य येऊ शकलेले नाही. देशभरात २०२१ मध्ये सुमारे ८५ हजार रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येऊन सुमारे सव्वा कोटी रक्ताच्या पिशव्या जमा करण्यात आल्या. यामध्ये महाराष्ट्राने २८,९२६ रक्तदान शिबीरांचे आयोजन केले असून १६ लाख ७३ हजार ९४७ रक्ताच्या पिशव्या गोळा केल्या आहेत. याकाळात जमा करण्यात आलेल्या एकूण रक्तापैकी केवळ ०.१५ टक्के रक्त हे बदली रक्तदानाद्वारे घेण्यात आले असून स्वैच्छिक रक्तदानाचे प्रमाण हे ९९.१० टक्के एवढे असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. २०२० मध्ये करोनाच्या पहिल्या टप्प्यातही महाराष्ट्रात २६,१०४ रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात येऊन त्यामाध्यमातून १५ लाख २८ हजार रक्ताच्या पिशव्या जमा करण्यात आल्याचे आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी सांगितले. २०२२ जानेवारी ते एप्रिल या कालावधित मुंबईत ११३७ रक्तदान शिबीराच्या माध्यमातून ९१,३९३ रक्ताच्या पिशव्या जमा करण्यात आल्या. त्या पाठोपाठ पुण्यामध्ये १२७९ रक्तदान शिबीरांच्या माध्यमातून ९१,३७७ रक्ताच्य पिशव्या जमा करण्यात आल्या असून सोलापूर जिल्ह्यात ४७,१३१ रक्ताच्या पिशव्या, ठाणे ३७,६४२ तर नागपूर येथे ३७,०२६ रक्ताच्या पिशव्या जमा करण्यात आल्याचे डॉ. साधना तायडे यांनी सांगितले.

१४ जून हा जागितक रक्तदान दिवस म्हणून साजरा केला जात असून या निमित्ताने अनेक उपक्रम करण्यात आले. राज्यात जमा होणाऱ्या रक्तापैकी १०,९१९ थेलेसेमीयाच्या रुग्णांना मोफत रक्त दिले जाते. त्याचप्रमाणे हिमोफेलियाच्या ५४९० तर सिकलसेलच्या ९८३७ रुग्णांना मोफत रक्त देण्यात येते. राज्यात ३६१ रक्तपेढ्या असून यातील ३०६ रक्तपेढ्यांमध्ये ‘रक्तघटक’ विलगीकरणाच्या सुविधा आहेत तर १३८ रक्तपेढ्यांमध्ये अफेरेसीसच्या सुविधा असल्याचे राज्य रक्तसंक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. राजेंद्र थोरात यांनी सांगितले.

…परिणामी सध्या येथे वार्षिक सरासरी २९ हजार रक्तसंकलन –

मुंबईतील जे.जे. महानगर रक्तपेढीत सुमारे ४० हजार रक्ताच्या पिशव्या संकलित करण्याची क्षमता असून अपुरे कर्मचारी तसेच या कर्मचाऱ्यांना पुरेशा सुविधा, तसेच आर्थिक सोयीसवलती देण्यात येत नसल्यामुळे गेल्या काही वर्षात रक्तसंकलन घसरणीला लागले आहे. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रक्तदान शिबीरासाठी पुरेसा भत्ताही दिला जात नाही. तसेच कामाच्या तुलनेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देतानाही आरोग्य विभागाकडून हात अखडता घेण्यात येत असल्याचे येथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना निवेदन दिले आहे, मात्र त्याची दखल आजपर्यंत घेण्यात आलेली नाही. याच्या परिणामी सध्या येथे वार्षिक सरासरी २९ हजार रक्तसंकलन होताना दिसते.

करोनाच्या दोन वर्षात म्हणजे २०२० व २०२१ मध्ये अनुक्रमे १९,३४९ व २०,८६४ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. अपुरे कर्मचारी असूनही करोनाकाळात केलेल्या या कामगिरीसाठी जागतिक रक्तदान दिवसानिमित्त आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते जे. जे. महानगर रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. आमचा सत्काराबरोबरच पुरेसे कर्मचारी भरणे तसेच वेतनवाढीसह आमच्या अन्य मागण्या मान्य केल्यास अधिक चांगले काम करता येईल, असे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Source: https://www.loksatta.com/maharashtra/maharashtra-is-first-in-the-country-in-blood-donation-and-mumbai-is-first-in-maharashtra-msr-87-2974051/