मुंबई बातम्या

मुंबई कोरडीच;राज्यात अन्यत्र पावसाला अनुकूल स्थिती – Loksatta

मुंबई : नैऋत्य मोसमी पाऊस राज्यभर पसरण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून नाशिक, नागपूर, औरंगाबाद, परभणी, मालेगाव, नंदुरबार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांत मोसमी पाऊस पडला. पावसाळय़ाच्या पहिल्याच टप्प्यात मुंबईत म्हणावे तसे पावसाचे आगमन झालेले नाही. मोसमी वारे वाहू लागले असले तरी अद्यापही मुंबई कोरडीच आहे. मुंबईत ११ जूनला मोसमी पावसाचे आगमन झाले. मात्र, मोसमी पावसाच्या आगमनाच्या नोंदीच आहेत. प्रत्यक्षात मुंबई आणि परिसरात पावसाळा सुरू झाल्याची जाणिव करून देणाऱ्या सरी कोसळलेल्या नाहीत.

हवामान विभागाच्या सांताक्रुझ केंद्रात मंगळवारी २.८ मि. मी. पावसाची नोंद झाली. उपनगरातील काही भागांत एखादी सर वगळता पावसाने दडी मारली होती. त्यामुळे दिवसाचे तापमानही वाढले होते.  मोसमी पाऊस उत्तर अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गुजरात राज्याचा आणखी काही भाग, दक्षिण मध्य प्रदेशचा काही भाग, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक आणि तमिळनाडू, विदर्भ आणि तेलंगणामध्ये पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. आंध्र प्रदेशचे आणखी काही भाग, पश्चिम मध्य आणि वायव्य बंगालचा उपसागर, ओडिशाचा काही भाग, गंगेचा पश्चिम बंगाल, झारखंड, संपूर्ण उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि बिहारच्या आणखी काही भागांत पुढील २ ते ३ दिवसांत पावसाची प्रगती दिसून येईल, असे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

जूनमध्ये खंड पडण्याची शक्यता

जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी १०१ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी वाऱ्याचा वेग कमी असल्याने जूनमध्ये पावसाचा खंड पडण्याचा अंदाज कृषी हवामान शास्त्र विभागाने वर्तवला होता. राज्यातील पंधरा हवामान स्थानकांच्या अभ्यासानुसार, हवेचा दाब अधिक राहिल्याने मोसमी पावसाची प्रगती झाली नाही. पूर्वमोसमी पाऊस देखील कमी प्रमाणात झाला. त्यामुळे केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. मोठे खंड घेऊन मोसमी पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने पेरणीसाठी घाई करू नये, असे ज्येष्ठ कृषी हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले.

आसाममध्ये चार मृत्युमुखी

गुवाहाटी : गुवाहाटीच्या बोरोगावमध्ये मुसळधार पावसाने दरड कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. गुवाहाटी शहर परिसरात पूर आला आहे. यंदा आसामममध्ये पूर आणि दरडी कोसळून मृत्यमुखी पडणाऱ्यांची संख्या आता ४२ झाली आहे.

Source: https://www.loksatta.com/mumbai/mumbai-is-dry-rains-southwest-monsoon-rains-conditions-ysh-95-2974314/