मुंबई बातम्या

ज्येष्ठांच्या समस्येबाबत मुंबई महापालिका उदासिन! – MahaMTB

मुंबई : पालिकेचे काम किंवा सरकारी काम म्हणजे सहा महिने थांब, अशी भावना मागील अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवर सत्तेत असणार्‍या शिवसेनेने निर्माण केली असल्याचा प्रत्यय दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या चमूला आला आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’चा चमू कांजुरमार्गला पोहोचला असता, तेथे एका आजींनी येऊन त्यांची व्यथा मांडली. “निदान तुमच्यामार्फत तरी माझी व्यथा पालिकेपर्यंत पोहोचेल,” असे अनेकदा मुंबई महापालिकेच्या चकरा मारून आणि त्यांना अर्ज करून थकलेल्या आजींनी भावना व्यक्त केली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत महापालिका उदासिन असल्याचे चित्र दिसून आले.

पालिकेच्या माणसांकडूनच पैशाची विचारणा

पालिकेला अनेकदा अर्ज पाठवूनही या आजींच्या घराशेजारील उंबराचे झाड तोडण्यात आलेले नाही. या झाडावरील फळे नेहमी घराच्या पत्र्यांवर पडत असल्याने घराचे पत्रे अनेकदा तुटले आहेत. तसेच, ही फळे पायाखाली आल्यामुळे बर्‍याचवेळा मी पाय घसरून पडली आहे, असे आजी म्हणाल्या. अनेकदा हे झाड तोडण्यात यावे किंवा दुसरी काहीतरी उपाययोजना करण्यात यावी, अशी विनंती आजींनी पालिकेकडे केली. परंतु, हे झाड तोडण्यासाठी पालिकेच्याच माणसांनी पैसे मागितले असल्याचे आजींनी सांगितले.

“मी येथे एकटीच राहते. माझ्या मागेपुढे मला पाहणारं कोणी नाही. मी घरकाम करून माझा उदरनिर्वाह करते. या झाडावरील पडणार्‍या फळांमुळे अनेकदा मी रात्रभर झोपतदेखील नाही. यासंदर्भात अनेकदा मी मुंबई महापालिकेकडे अर्ज पाठवले आहेत. परंतु, पालिका कोणतीही पावले उचलत नाही,” असे मत आजींनी व्यक्त केले. त्यामुळे ‘सरकारी काम म्हणजे सहा महिने थांब,’या म्हणीनुसार, महापालिकेच्या आपण शेकडो चकरा जर मारल्या नाहीत, तर आपले काम होणार नाही, असा प्रत्यय पालिकेवर अनेक वर्षे सत्तेत असणारी शिवसेना खरी करत असल्याची भावनाच आजींनी व्यक्त केली.

Source: https://www.mahamtb.com/Encyc/2022/6/10/Mumbai-Municipal-Corporation-is-sad-about-the-problem.html