मुंबई बातम्या

पावसाळ्यातील पूरपरिस्थितीला मुंबई महापालिकाच जबाबदार! – MahaMTB

मुंबई: “दरवर्षी पहिल्याच पावसाळ्यात हार्बर लाईनची रेल्वे वाहतूक विस्कळीत होते, तर चुनाभट्टी आणि शीव परिसरात पावसाचे पाणी तुंबते. दरवर्षी ओढावणार्‍या या परिस्थितीला मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा गलथान कारभारच जबाबदार आहे,” असा आरोप स्थानिक नागरिकांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना केला आहे. दरवर्षी जून-जुलै महिन्यात होणार्‍या पहिल्याच पावसात मुंबई आणि उपनगरांमध्ये पूरसदृश्यस्थिती निर्माण होते. पावसाळ्यापूर्वी मुंबई महापालिकेकडून करण्यात येणार्‍या नालेसफाई आणि गाळ याबाबत योग्य कारवाई होत नसल्याने ही परिस्थिती उद्भवत असल्याची व्यथा येथील नागरिकांनी मांडली.

मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष

याविषयी चुनाभट्टी येथील स्थानिक नागरिक सुधीर शेटे सांगतात की, “१९७४ पासून नागरिक येथील सोसायटींमध्ये राहत आहेत. त्यावेळी आजूबाजूला एवढी घाण नव्हती. मात्र, मागील काही वर्षांत सर्व परिस्थिती बिघडली आहे. आमच्या सोसायटीने १९८५ साली ‘क्लीन बॉम्बे, ग्रीन बॉम्बे’ हा पुरस्कार मिळवला आहे. जास्वंदीच्या 35 प्रजाती इथे आम्ही लावल्या होत्या. परंतु, कालांतराने या भागात बेकायदा बांधकामे होऊ लागली. आम्ही या बेकायदा बांधकाम आणि व्यवसायांबाबत वारंवार तक्रारी करूनही मुंबई महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करताना दिसते.”

‘मुंबई महापालिकेला जराही लाज वाटत नाही’

“इथे बेकायदा चालणारे व्यवसाय, त्यांचे उरलेले सामान, खाद्यपदार्थ हे गटारात फेकले जातात आणि इथली गटारे तुंबतात. तुंबलेल्या चुनाभट्टी परिसराचा फोटो दरवर्षी पहिल्याच पावसात छापून येतो, ही काही अभिमानाची गोष्ट नाही. पण, मुंबई महापालिकेला जराही लाज वाटत नाही की, दरवर्षी ही परिस्थिती ओढवते, तर या भागासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, गाळ काढला जातो आणि तो तिथेच पडून राहतो. परत पाऊस आला की, तो गाळ नाल्यात वाहून जातो,” असेही शेटे म्हणाले.

बगिच्याऐवजी ‘डम्पिंग ग्राऊंड’

या भागात वाढत असलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत माहिती देताना ते म्हणाले, “नोव्हेंबर २०१९ ला ‘बीकेसी’ला जोडणारा हा पूल बांधण्यात आला. आमच्या महितीनुसार तिथे बगिचा व्हायला पाहिजे. मात्र, बगिचा तर दूर, तो भाग आता ‘डम्पिंग ग्राऊंड’ झाला आहे. यांना जाग कशी येत नाही की, सुरू काय आहे. आमचे नगरसेवक लक्ष देत नसल्याची तक्रारही त्यांनी यावेळी मांडली.

नाल्यांना प्रवाह नाही

गेल्यावर्षी पावसाळ्यात १५ तास हार्बर लाईन बंद होती. त्याचे कारण की, “इथून जाणार्‍या नाल्यांना पुढे प्रवाहच नाही. इथे जे व्यवसाय चालतात त्यांच्याविरोधात आम्ही मुंबई पालिकेकडे तक्रार करूनही काही झाले नाही. पालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच, रेल्वे प्रशासनाकडूनही रेल्वे रूळांवर साचणार्‍या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी कोणतेही नियोजन नाही,” अशी माहिती येथील स्थानिक नागरिकांनी दिली.

Source: https://www.mahamtb.com/Encyc/2022/6/9/problem-of-nallas-in-chunabhatti-mumbai.html