मुंबई बातम्या

फ्लेमिंगोंची वाटचाल टिपण्यासाठी त्यांना कसं टॅगिंग केलं जातं? – BBC

  • मयांक भागवत
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी

फोटो स्रोत, Getty Images

मुंबईत टॅग करण्यात आलेला पक्षी थेट रशियाला पोहोचलाय. या पक्षाने तब्बल 5000 किलोमीटरपेक्षा जास्तचा प्रवास केलाय.

पक्ष्यांचं स्थलांतर आणि त्यांच्या प्रवासाचा अभ्यास करण्यासाठी पक्षी शास्त्रज्ञांकडून पक्ष्यांचं टॅगिंग केलं जातं. यात, पक्षांच्या पायावर विशिष्ठ प्रकारची खूण केली जाते. सोप्या भाषेच सांगायचं झालं तर, हा टॅग पक्षाची खास ओळख बनतो. जेणेकरून जगभरात कुठेही हा पक्षी दिसला तर, त्याची ओळख पटवली जाऊ शकते.

पावसाळा सुरू होण्याआधी फ्लेमिंगो पुन्हा एकदा आपल्या कच्छच्या रणात स्थलांतर करतात. अशा पक्षांच्या प्रजातींचा अभ्यास करण्यासाठी टॅगिंगची पद्धत अवलंबिली जाते. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने आत्तापर्यंत हजारो पक्षांचं टॅगिंग केलंय. मुंबईत येणाऱ्या 6 फ्लेमिंगो पक्षांचंही टॅगिंग करण्यात आलंय. हे टॅगिंग कसं केसं जातं? पक्ष्यांना टॅग केल्यामुळे शास्त्रज्ञांना काय माहिती मिळते? पक्ष्यांच्या संवर्धनात याचा फायदा होतो का? आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

मुंबईतील पक्षी पोहोचला रशियात

पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (BNHS) फेब्रुवारी 2020 मध्ये ‘रेड शॅंक’ प्रजातीच्या एका पक्षाला मुंबईत टॅग केलं होतं.

दोन वर्षांनंतर एप्रिल 2022 मध्ये हा ‘रेड शॅंक’ पक्षी रशियाच्या अॅलटाई भागात आढळून आलाय. रशियन पक्षीतज्ज्ञांना हा पक्षी आढळून आल्यानंतर त्यांनी BNHS सोबत संपर्क केला. त्यामुळे, या पक्षाने 5000 किलोमीटरचा मोठा टप्पा पार केल्याची माहिती मिळाली.

याबाबत माहिती देताना BNHS चे शास्त्रज्ञ मृगांक प्रभू म्हणाले, “या रेड शॅंक पक्षाला 1U9 असा टॅग लावण्यात आला होता. दोन वर्षानंतर हा पक्षी रशियामध्ये आढळून आलाय.” या कालावधीत आपल्याला या रेड शॅंक पक्षाच्या दोन ठिकाणांची माहिती मिळालीये.

बीएनएचएसने टॅग केलेला रेड शॅंक पक्षी

फोटो स्रोत, Mrugank Prabhu

रेड शॅंक पक्षाचा आकार साधारणत: 30 सेंटीमीटर असतो. तर, या पक्षाचं वजन 100 ते 130 ग्रॅम असतं. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, या पक्षाचे पाय लाल रंगाचे असतात.

“रशियाच्या पक्षी संवर्धन संस्थेच्या तज्ज्ञांना हा रेड शॅंक आढळून आला. पक्षाच्या टॅगवरून हा पक्षी भारतातून आला असण्याची शक्यता त्यांना वाटली. त्यामुळे त्यांनी भारतात संपर्क केला,” मृगांक प्रभू पुढे सांगतात. ज्यावेळी हा पक्षी आढळून आला, तेव्हा काय परिस्थिती होती याबाबत रशियन तज्ज्ञांनी भारतीय शास्त्रज्ञांना माहिती दिली.

मुंबईतील रेड शॅंक पक्षाला लेग बॅंड टॅगिंग पद्धतीने टॅंग करण्यात आलं होतं. याच टॅगवरून त्याची ओळख पटवण्यास मदत झाली.

पक्ष्यांचं टॅगिंग कसं केलं जातं?

पक्षांच्या टॅगिंगचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.

  • ट्रेडिशनल रिंग टॅगिंग, लेग बॅंड टॅगिंग
  • साटेलाईट टॅगिंग

पक्षी शास्त्रज्ञ मृगांक प्रभू सांगतात, “ट्रॅडिशनल टॅगिंग पद्धतीमध्ये पक्षांच्या पायात एक रिंग घातली जाते. ही रिंग अॅल्युमिनियमची असते. या रिंगवर एक खास नंबर असतो. जेणेकरून पक्षाच्या पायातील ही रिंग पाहून हा पक्षी कुठून आलाय याची माहिती मिळू शकते.” पक्षांना टॅग करण्याची ही सर्वात जुनी पद्धत आहे. पण, या पद्धतीचे काही दोष आहेत.

Flamingo

जोपर्यंत पक्षी पकडला जात नाही किंवा या रिंगवरील नंबर माहिती होत नाही तोपर्यंत या पक्षाबाबत काहीच माहिती मिळू शकत नाही. मृगांक प्रभू पुढे सांगतात ” मुंबईतून रशियाला पोहोचलेल्या पक्षाचे मुंबई आणि रशिया अशा दोन ठिकाणांची माहिती मिळाली. पण, वाटेतील प्रवासाबाबत काहीच माहिती मिळाली नाही.” हा या ट्रेडिशनल पद्धतीचे दोष आहे.

ट्रेडिशनल रिंग टॅगिंग पद्धतीला शास्त्रज्ञांनी लेग बॅंड टॅगिंगची जोड दिली. तज्ज्ञ सांगतात, लेग बॅंड टॅगिंगमध्ये पक्षाच्या एका पायात रिंग घातली जाते आणि दुसऱ्या पायाला लेग बॅंग बांधला जातो. मृगांक पुढे म्हणाले, “उत्तर भारतासाठी एक खास कोड आहे. यात दोन पांढरे फ्लॅग वापरले जातात. यातील एका पांढऱ्या फ्लॅगवर लाल रंगाचं इक्रिप्शन असतं.”

फ्लेमिंगो पक्षाला BNHS ने सॅटेलाइट टॅगिंग केलं

फोटो स्रोत, Mrugank Prabhu

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडून 2018 पासून स्थलांतर करून मुंबईत येणाऱ्या पक्ष्यांचा अभ्यास सुरू करण्यात आलाय. या अभ्यासांतर्गत अनेक पक्ष्यांचं टॅगिंग करण्यात आलंय. “हे टॅग इतके हलके असतात की पक्ष्यांना उडताना किंवा त्यांच्या जीवनचक्रामध्ये त्रास देत नाहीत. या टॅगसह पक्षी सहज उडू शकतात,” मृगांक पुढे सांगतात.

पक्ष्यांना टॅंग करण्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोटोकॉल किंवा मापदंड आहेत. लेग बॅंड पद्धतीत पक्षांना टॅग करताना खास नंबर देण्यात येतो. या टॅगवर एक इंग्रजी अक्षर आणि एक अंक असतो. जेणेकरून त्या पक्षाची सहजतेने ओळख पटवता येईल.

पक्ष्यांना टॅग करण्याची दुसरी पद्धत म्हणजे सॅटेलाइट टॅगिंग. बीएनएचएसकडून जानेवारी 2022 ते एप्रिल 2022 या तीन महिन्यात सहा फ्लेमिंगो पक्षांना सॅटेलाईट टॅगिंग करण्यात आलंय. या फ्लेमिंगोना जीएसएम आणि जीपीएस टॅग लावण्यात आले. मृगांक पुढे म्हणाले, “यात एक बेल्ट पक्षाच्या अंगावर बांधला जातो. पक्षाच्या पंखांना याचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊन, त्याच्या त्वचेला तो कनेक्ट होईल असा बांधला जातो.”

पक्ष्यांना टॅग का केलं जातं?

मुंबईत स्थलांतर करून आलेले 54 विविध प्रकारचे लहान-मोठे पक्षी आढळून येतात. पक्षीतज्ज्ञांच्या मते, पक्षी एकसारखे दिसतात. त्यामुळे त्यांची सहजतेने ओळख पटवण्यासाठी खास टॅग दिले जातात. जेणेकरून या पक्षांची संख्या किती आहे हे आपल्याला कळू शकतं.

मृगांक प्रभू पुढे म्हणाले, “सॅटेलाइट टॅगिंगच्या माध्यमातून आपल्याला ठराविक काळाने पक्षाबद्दल माहिती मिळत रहाते. जीपीएस डेटा मिळाल्याने तो पक्षी कुठे आहे? किती उंचीवर उडतोय? कसा प्रवास करतोय. हा पक्षी किती वेगाने प्रवास करतोय आणि त्याठिकाणी तापमान कसं आहे याची माहिती मिळू शकते.”

स्थलांतर करताना पक्षी एका ठराविक मार्गाने प्रवास करतात. पक्षीतज्ज्ञांच्या भाषेत याला फ्लाय-वे म्हटलं जातं. या फ्लाय-वेचा अचूक अभ्यास करण्यासाठी याचा वापर होतो. बीएनएचएसचे तज्ज्ञ सांगतात, स्थलांतरदरम्यान प्रवासात हे पक्षी कुठे थांबतात हे कळू शकतं. या जागांचं आपण संवर्धन करू शकतो. जेणेकरून या पक्ष्यांचं अस्तित्व दिर्घकाळ टिकवून ठेऊ शकतो.

सॅटेलाइट टॅगिंग केल्यानंतर मिळालेली पक्षाच्या प्रवासाची माहिती

फोटो स्रोत, Mrugank prabhu

मुंबईत सॅटेलाइट टॅग केलेले फ्लेमिंगो पक्षी मुंबई, नवी मुंबईच्या आसपासच्या खाडीमध्येच फिरत असल्याचं संशोधकांना आढळून आलंय. हे पक्षी भरतीच्या वेळी कांदळवनांमध्ये म्हणजेच मॅनग्रोव्हमध्ये आसरा घेतात. तर, ओहोटीच्या वेळी खाडीत येतात.

पण, पक्ष्यांचा अभ्यास करून मिळणाऱ्या माहितीचा संशोधकांना फायदा काय? मृगांक प्रभू पुढे म्हणाले, “खाडीतून वीजेच्या हाय ट्रान्समिशन लाईन्स येत असतील. तर, पक्ष्यांच्या प्रवासात त्या अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. थंडीत धुक्यामुळे पक्षांना दिसत नाही.” हे पक्षी मोठ्या संख्येने एकत्र येतात. त्यामुळे त्यांचा जीव जाण्याची शक्यता असते. “पक्षांचा प्रवास किंवा फिरण्याच्या जागेचा अभ्यास करून आपण त्यांचा जीव जाणार नाही यासाठी प्रयत्न करू शकतो.”

पक्षीतज्ज्ञ सांगतात, परदेशातून स्थलांतर करून येणाऱ्या पक्षांची संख्या हळूहळू कमी होऊ लागलीये. आपल्याकडे विविध ठिकाणहून पक्षी येत आहेत. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा भाग आपल्याकडे केला जातोय. पक्षांना चांगलं अन्न मिळालं नाही तर, त्यांचं प्रजनन योग्य होणार नाही. त्यामुळे टॅगिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याकडे पक्षांची पूर्ण माहिती असेल तर त्यांचं संवर्धन करणं शक्य आहे.

पक्ष्यांना टॅग करण्यासाठी किती वेळ लागतो?

पक्षी पकडणं हे सोपं नाही. यासाठी खूप प्रशिक्षण लागतं. बर्ड ट्रॅप किंवा जाळ्याच्या माध्यमातून पक्षी पकडले जातात. एखाद्या वशिष्ठ प्रजातीचा पक्षी पकडायचा असेल तर, त्यासाठी खास ट्रॅप बनवावा लागतो. पक्षाला पकडून त्याला टॅग करेपर्यंत पक्षाच्या जीवाला काही होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते.

मृगांक पुढे म्हणाले, “पक्षाला पकडून त्याला टॅग करण्याची प्रोसेस फक्त एका मिनिटाच्या आत पूर्ण केली जाते. पक्षाला बेशुद्ध करू शकत नाही. त्यामुळे पकडल्यानंतर पक्षाला त्रास होणार नाही. हे लक्षात घेऊन मिनिटभराच्या आत टॅग लावला जातो.”

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

फ्लेमिंगोला सॅटेलाईट टॅग करण्यासाठी जास्त वेळ लागतो. यासाठी विशेष बेल्ट वापरण्यात येतो.

मुंबईत फ्लेमिंगोंची संख्या जास्त?

मुंबई महानगर प्राधिकरण परिसरात 2021-2022 मध्ये सर्वात जास्त संख्येने ग्रेटर फ्लेमिंगो आल्याचं दिसून आलंय. फ्लेमिंगोच्या जगभरात आढळून येणाऱ्या सहा प्रजातींपैकी दोन प्रजाती ग्रेटर आणि लेसर फ्लेमिंगो भारतात आढळून येतात.

डिसेंबर 2021 ते मार्च 2022 या काळात

  • ठाणे खाडीत 54000 ग्रेटर फ्लेमिंगो आढळून आले
  • शिवडीच्या खाडीत ही संख्या 17000 होती
  • गेल्यावर्षी अत्यंत कमी संख्येने ग्रेटर फ्लेमिंगो आढळून आले होते

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे उपसंचालक राहुल खोत म्हणाले, “गेल्या दोन वर्षात फार कमी संख्येने ग्रेटर फ्लेमिंगो आढळून आले. याचं एक कारण म्हणजे कोरोनामुळे मार्च ते मे महिन्यात सर्वेक्षण करता आलं नव्हतं.” यंदाच्या वर्षी फ्लेमिंगोचं प्रमाण का वाढलंय याचा अभ्यास बीएनएसएसची टीम करत आहे. मार्च ते मे या तीन महिन्यातच जास्त संख्येने ग्रेटर फ्लेमिंगो पहायला मिळतात.

Flamingo

ते पुढे सांगतात, “ग्रेटर फ्लेमिंगोना फ्रेशवॉटर आवडतं. मुंबईत खाडी असल्यामुळे त्यांना हे वातावरण सहजतेने मिळतं. या परिसरात मिळणारं अन्नही एक कारण आहे की फ्लेमिंगो इथे येत असतील.”

मुंबईत शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंकच्या बांधकामामुळे स्थलांतरीत पक्षांवर काय परिणाम होतोय. यावर 2017 पासून संशोधन सुरू आहे. मॅनग्रोव्ह सेलचे अतिरिक्त प्रधान वनसंरक्षक विरेंद्र तिवारी सांगतात, “गेल्यावर्षी ठाण्यातील फ्लेमिंगो सॅन्च्युअरीत एक लाखांपेक्षा जास्त फ्लेमिंगो पक्षी आढळून आले होते. या पक्षांच्या जागांचं संवर्धन करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

गुजरातच्या कच्छमध्ये मोठ्या संख्येने फ्लेमिंगोची कॉलनी आहे. त्याठिकाणी फ्लेमिंगो प्रजनन करतात आणि त्यानंतर नोव्हेंबर ते मे महिन्यात मुंबईत येतात. मुंबईत अचानक मोठ्या संख्येने फ्लेमिंगो येण्यामागे कारण काय? BNHS चे शास्त्रज्ञ मृगांक प्रभू याची तीन प्रमुख कारणं सांगतात.

  • फ्लेमिंगोच्या प्रजनन स्थळावर मोठ्या संख्येने प्रजनन झालं असेल तर, मुंबईत मोठ्या संख्येने पक्षी आले असतील
  • पाऊस कमी झाल्यामुळे पाणथळ जागांवरील पाणी आटलं असेल तर मोठ्या संख्येने फ्लेमिंगो आले असण्याची शक्यता आहे
  • मुंबईत फ्लेमिंगो पक्षी अन्नाच्या शोधात येतात. खाडीच्या परिसरात त्यांना चांगलं अन्न मिळतं

फ्लेमिंगो पक्षी निळ्या आणि हिरव्या रंगाची अल्गी, ज्याला सामान्य भाषेत आपण शेवाळं म्हणतो ते खातात. युट्रोफिकेशन प्रक्रियेमुळे मुंबई आणि परिसरात अल्गी वाढल्याचं तज्ज्ञांच मत आहे. मुंबईत खाण्यासाठी चांगलं अन्न मिळत असल्यामुळे मोठ्या संख्येने फ्लेमिंगो आले असावेत. युट्रोफिकेशन प्रक्रियेमध्ये पाण्यातील क्षार आणि प्रौष्टीक घटकांचं प्रमाण वाढतं.

पण, काही पक्षीतज्ज्ञ यामागे सांडपाणी आणि कंपन्यातून नदीत सोडलं जाणारं पाणी देखील कारणीभूत आहे असं म्हणतायत. पक्षीतज्ज्ञ निखिल भोपळे म्हणतात, “सांडपाणी आणि कंपन्यातून नदीत सोडलं जाणारं वेस्ट वॉटर यामुळे अल्गल ब्लूम वाढली आहे. याचा फ्लेमिंगोना फायदा होतोय. पण, हे चांगलं का वाईट हे आपल्याला माहित नाही. यावर अभ्यास सुरू आहे.”

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

‘सोपी गोष्ट’ आणि ‘3 गोष्टी’ हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

Source: https://www.bbc.com/marathi/india-61491164