मुंबई बातम्या

मुंबई महापालिकेत टीडीआर आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्र घोटाळा, काँग्रेसची केंद्रीय – ABP Majha

मुंबई :  मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासातील दोन सर्वात मोठे  घोटाळे झाल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.  मुंबईकर करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी  करणारा टिडीआर घोटाळा तर सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचा 21 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे आरोप कॉंग्रेसने केले आहे. टीडीआर घोटाळा संदर्भात मुंबई काँग्रेसने लोकायुक्त, महापालिका आयुक्त प्रशासक, केंद्रीय दक्षता समिती यांना पत्र दिले आहे. 

काय आहे टीडीआर घोटाळा?

मुंबई महापालिकेने प्रकल्पबाधित पुनर्वसन व्यक्तींसाठी विविध ठिकाणी मंजूर केलेल्या प्रकल्पांतील टीडीआर, प्रीमियम, क्रेडिट नोटच्या अनुषंगाने संबंधित विकासकांना सुमारे 8 ते 9 हजार कोटी रुपयांचा फायदा करुन दिल्याचा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसकडून करण्यात आला आहे. मुंबईमधील प्रकल्पबाधितांसाठी बांधण्यात येणाऱ्या घरात 9380 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप मुंबई मनपाचे माजी विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. 

विकासकांना फायदा कसा?

पालिकेने वरळी जी साऊथ, मुलुंड टी वॉर्ड, भांडुप एस वॉर्ड, चांदीवली एल वॉर्ड या ठिकाणी 14500 प्रकल्पग्रस्तांसाठी घरे बांधायचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यासाठी रेडी रेकनर नुसार 3200 कोटी रुपये खर्च यायला हवा होता. मात्र पालिकेने विकासकांना फायदा पोहचवण्यासाठी 12 हजार कोटीहून अधिकचे प्रस्ताव मंजूर केले आहे. यामधून प्रीमियम क्रेडिट नोट, भूखंड टीडीआर, बांधकाम टीडीआर यामधून विकासकांना 9380 कोटींचा फायदा करून देण्यात आला आहे असा आरोप रवी राजा यांनी केला आहे. प्रकल्पबाधितांच्या घराच्या बांधकामात घोटाळा झाल्याने त्याची तक्रार लोकायुक्त, पालिका आयुक्त तसेच सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन यांना करण्यात आली आहे. याबाबत न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालय व नंतर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा रवी राजा यांनी दिला आहे.

1. भांडुप पश्चिम येथे न्यू वर्ल्ड लँडमार्क एलएलपी विकासकाम 1,056 कोटी 75 लाख रुपये इतका फायदा याठिकाणी 1903 घरे बांधली जाणार आहेत. त्यासाठी विकासकास 39 हजार चौरस फूट दराने विकासकास रक्कम आणि टीडीआर, क्रेडिट नोट देण्यात येणार आहे.

2. मुलुंड पूर्व येथे स्वास कन्स्ट्रक्शनला तिथल्या योजनेतील 4114 कोटी रुपयाचा फायदा होणार असल्याचा आरोप आहे. या प्रकल्पात 7, 439 घरे बनविण्याची योजना असून त्यासाठी प्रत्येक घरामागे विकासकास प्रति चौरस फूट 38 हजार रु. देण्यात येतील. त्याबरोबर टीडीआर, क्रेडिट नोटही दिले जातील. 

3. चांदिवली येथे नगर भूमापन क्र. 11 ए/5 येथे विकासकास  2123 कोटी 81 कोटी रुपयाचा फायदा होणार असल्याचा आरोप  

4. माहिम येथील भूखंड क्रमांक 1074  नगर रचना योजना चार येथे क्लासिक प्रमोटर्स अँड बिल्डर प्रा. तर्फे प्रकल्पबाधित पुनर्वसन योजनेत 529  घरे असून त्यांचे क्षेत्रफळ हे 3,317  चौरस मीटर आहे. त्याठिकाणी प्रत्येक घरांची किंमत आणि क्रेडिट नोट, टीडीआर, जमिनीची किंमत आदी सर्व हिशोब केल्यास तिथे विकासकास 680 कोटी 91 लाख रुपयाचा लाभ होणार असल्याचा आरोप केला आहे. 

5. वरळी येथे 529 घरे बांधण्यासाठी क्लासिक प्रमोटर अँड बिल्डरला 617 कोटी 88 लाख रुपये दिले जातील. तसेच, चांदिवलीतील प्रकल्पासाठी डीबी रिऍलिटीस चार हजार घरे बांधण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यासाठी प्रति चौरस फूट 35 हजार रुपये रक्कम, टीडीआर, क्रेडिट नोट देण्यात येणार आहे. 

या प्रकल्पात घरे बांधण्यासाठी रेडी रेकनरनुसार पाहिल्यास पालिकेचे नुकसान होत असल्याचा आरोप केला आहे.  

काय आहे एसटीपी घोटाळा?

  मुंबई काँग्रेसने पालिकेच्या 24 हजार कोटी रूपयाच्या सात मलजल (सांडपाणी) प्रक्रिया केंद्र उभारणीच्या प्रकल्पाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकल्पासाठी येणारा खर्च 2018 मध्ये 10 हजार कोटी रुपये खर्च येणार होता. हा खर्च 2016 मध्ये 16 हजार कोटी रुपयांवर आणि 2022 मध्ये हा खर्च 24 हजार कोटी रुपयांवर गेला आहे

Source: https://marathi.abplive.com/news/mumbai/maharashtra-news-complaint-to-congress-central-vigilance-committee-and-lokayukta-about-tdr-and-sewage-treatment-center-scam-in-bmc-1061144