मुंबई बातम्या

ओठांचं चुंबन घेणं हा लैंगिक गुन्हा नाही – मुंबई उच्च न्यायालय #5मोठ्याबातम्या – BBC

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. ओठांचं चुंबन घेणं हा लैंगिक गुन्हा नाही – उच्च न्यायालयाचं निरीक्षण

ओठांचं चुंबन घेणं आणि लैंगिक अवयवाला स्पर्श करणं हा अनैसर्गिक लैंगिक कृत्याचा गुन्हा ठरत नाही, असं निरीक्षण नोंदवून मुंबई उच्च न्यायालयाच्या एकलपीठानं 14 वर्षांच्या मुलाचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या आरोपीला नुकताच जामीन मंजूर केला.

मुलाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर आरोपीवर भारतीय दंडसंहितेच्या कलम 377 नुसार (अनैसर्गिक लैंगिक संबंध) आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) आणि मुलाच्या जबाबानुसार, आरोपीनं त्याच्या ओठांचं चुंबन घेतलं आणि त्यानं त्याच्या गुप्तांगाला स्पर्श केला.

आपल्या मते, सकृतदर्शनी आरोपीचं हे कृत्य अनैसर्गिक लैंगिक गुन्हा होऊ शकत नाही, असं निरीक्षण न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी आरोपीला जामीन मंजूर करताना नोंदवलं.

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, कपाटात ठेवलेले पैसै कमी असल्याचे मुलाच्या पालकांना आढळले. त्यामुळे त्यांनी मुलाकडे त्याबाबत विचारणा केली असता तो ऑनलाइन गेम खेळत असल्याचं आणि आरोपीच्या दुकानात या ऑनलाइन गेमचं रिचार्ज करण्यासाठी खर्च केल्याचं त्यानं सांगितले.

त्याच वेळी असाच एकदा तो ऑनलाइन गेम रिचार्जसाठी गेला असताना आरोपीनं ओठांचे चुंबन घेतल्याचं आणि गुप्तांगाला स्पर्श केल्याचंही मुलानं पालकांना सांगितलं. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 377 आणि ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.

2. मान्सून 24 तासात अंदमानात दाखल होण्याची शक्यता

नैऋत्य मान्सून येत्या 24 तासात अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे. दक्षिण अंदमानचा समुद्र आणि लगतच्या बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात हा मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. यामुळं पुढच्या 5 दिवसात अंदमान – निकोबार बेटांवर वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

बंगालच्या उपसागराच्या पूर्व भागात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहू शकतात. केरळमधल्या काही जिल्ह्यात मुसळधार पावसानं ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. मात्र त्याचवेळी देशाच्या वायव्य भागात तसंच मध्य भारतात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून येत्या 2 दिवसात त्याची तीव्रता कमी होईल, असंही हवामान विभागानं म्हटलंय.

दुसरीकडे राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या मध्य महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांसह परभणी, हिंगोली नांदेड, लातूर, उस्मानाबाद या नऊ जिल्ह्यांना 16 ते 19 मे पर्यंत चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा (येलो ॲलर्ट ) हवामान विभागानं दिला आहे.

3. ‘मुघलांनी उद्ध्वस्त केलेली मंदिरं परत मिळवावी’

मुघलांनी उद्ध्वस्त केलेली सर्व 36,000 मंदिरे ‘कायदेशीरपणे’ परत मिळवली पाहिजेत, असं मत माजी केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते के.एस ईश्वरप्पा यांनी व्यक्त केलं आहे.

के.एस ईश्वरप्पा

फोटो स्रोत, @ikseshwarappa

“मुघलांनी या देशात 36,000 मंदिरे पाडली आहेत. रोज बातम्या येत आहेत. या मंदिरांसाठी लढा किंवा संघर्ष न करता न्यायालयाच्या निकालाच्या आधारे आपण या मंदिरांवर पुन्हा दावा करू शकतो,” असं ईश्वरप्पा म्हणाले.

उजव्या विचारसरणीच्या गटांनी हिंदू मंदिरांच्या खुणा शोधण्यासाठी अनेक मशिदींचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली असताना ईश्वरप्पा यांनी हे विधान केलं आहे.

4. केरळमध्ये आम आदमी पक्षाची ट्वेंटी-20 सोबत युती

केरळमध्ये आम आदमी पक्षानं (आप) ट्वेंटी-20 पक्षासोबत युती करण्याची घोषणा केली आहे.

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे.

केजरीवाल, केरळ

फोटो स्रोत, @ArvindKejriwal

यावेळी त्यांनी म्हटलं की, आप दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत येऊ शकतं तर केरळमध्येही त्यासाठी काही अडचण नाहीये.

केरळमधील प्रमुख प्रादेशिक पक्षांना तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत नसल्याचंही यावेळी ते म्हणाले.

5. मुख्यमंत्री काहीच बोलत नाही, लोकायुक्त कायद्यासाठी रान पेटवणार -अण्णा हजारे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकायुक्त कायद्यासाठी पुन्हा एकदा रान पेटवण्याची घोषणा केली आहे. अडीच वर्षांपूर्वी लोकायुक्त कायदा करू, असे लेखी आश्वासन देणारे मुख्यमंत्री आता याविषयी बोलतही नाहीत. याचा अर्थ यामागे नक्कीच काही तरी घडलंय, असा आरोप हजारे यांनी केला आहे.

अण्णा हजारे

फोटो स्रोत, AFP

भ्रष्टाचार जन आंदोलनाच्या कार्यकर्त्यांचे शिबिर राळेगणसिद्धीत झाले. त्याच शिबिरात अण्णांनी आंदोलन करण्याचा निर्धार केला.

त्यानंतर माध्यमांशी बोलताना अण्णा हजारे म्हणाले, “लोकायुक्त कायदा करण्याचे लेखी आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दिले होते. मात्र, अडीच वर्षे उलटूनदेखील त्यावर काहीच कार्यवाही होत नाही. मुख्यमंत्री ठाकरे यावर बोलायलासुद्धा तयार नाहीत. नेमके या कायद्याबद्दल काय झाले, हे कळायला मार्ग नाही. काय घडले? कोणी जादू केली? ठाकरे कसे बोलायचे बंद झाले? या विषयी मला माहिती नाही.”

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

‘सोपी गोष्ट’ आणि ‘3 गोष्टी’ हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

Source: https://www.bbc.com/marathi/india-61456950